खऱ्या अर्थाने नाटकानेच मला जिवंत ठेवले, अशा शब्दांत रंगभूमीशी असलेले नाते नेहमी सांगणारे ज्येष्ठ नाट्य व सिने अभिनेते जयंत सावरकर यांचं आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी ठाण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. जयंत सावरकर यांनी वयाच्या विसाव्या वर्षी, म्हणजे १९५५ पासून चेहऱ्याला रंग लावून कारकिर्दीची नांदी केली. रंगभूमीवर वावरायचे या एकाच प्रेरणेने ते झपाटले होते. सुरुवातीची बरीच वर्षे ते बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होते सोबत त्यांनी नोकरीतही तग धरला होता. (Jayant Savarkar Passed Away)
पाहा जयंत सावरकरांच्या गाजलेल्या भूमिका (Jayant Savarkar Passed Away)

जयंत सावरकर यांनी शंभरहून अधिक मराठी आणि तीसहून अधिक हिंदी चित्रपटांत काम केलं आहेत. ‘एकच प्याला’तील तळीराम, ‘तुझे आहे तुजपाशी’मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरितात्या या नाटकांमधील भूमिका जयंत सावरकर यांच्या नावे आहेत. ‘पोलीस लाईन’, ‘हरिओम विठ्ठला’, ‘सिंघम’, ‘वास्तव’, ‘विघ्नहर्ता’ या सिनेमांमधील त्यांची भूमिका विशेष गाजली. तसेच ‘फुलपाखरू’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमधील जयंत सावरकर यांची भूमिकाही प्रेक्षकांना विशेष भावली.
जयंत सावरकर हे ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, डॉ. गो. खांडेकर स्मृती पुरस्कार तसेच विष्णुदास भावे पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘एक छोटा माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले आहे. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, ययाति आणि देवयानी, याही नाटकांमधून सावरकरांनी छाप पाडली.
