Bigg Boss Marathi Season 5 Opening Ceremony Updates : ‘बिग बॉस मराठी’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित रिॲलिटी शोचं बिगुल आता वाजलं आहे आणि नुकतीच या शोच्या नव्या पर्वाची दिमाखात सुरुवातदेखील झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. १०० हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या कलावंतांवर आपली नजर रोखायला सज्ज झाले आहेत. या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज पार पडणाऱ्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा होणार आहे. आशातच या घरातील पहिल्या स्पर्धकाची घरात एंट्री झाली आहे आणि या पहिल्या स्पर्धक म्हणजे ९०च्या दशक गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर आहेत.
वर्षा उसगांवकर बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वामध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली होती आणि या चर्चा अखेर आता खऱ्या ठरल्या आहेत. कारण बिग बॉसच्या नवीन पर्वात त्यांनी नुकताच प्रवेश केला आहे. वर्षा यांनी काही दिवसांपूर्वीच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेतून निरोप घेतला होता. तेव्हापासूनच त्या घरात येणार असल्याच्या चर्चा होत होत्या. वर्षा यांच्यासह कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावळकर व अभिनेता निखिल दामले यांचाही समावेश झाला आहे.
दरम्यान, नुकतीच ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली असून हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीसह जिओ सिनेमावरही पाहता येणार आहे. रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघता येणार आहे. २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.