Vaishnavi Hagawane Death : सासरच्या मंडळींकडून अमानूष छळ, शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणेने आत्महत्या केली. हे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. दरम्यान प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. तर दीर सुशील हगवणे व सासरे राजेंद्र हगवणे फरार आहेत. हगवणे कुटुंबिय हे राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे राज्य कार्यकारिणी सदस्य होते. वैष्णवीने जीवन संपवल्यानंतर हगवणे यांची मोठी सून मयुरी जगतापनेही मोठे खुलासेही केले. आहेत. मयुरीलाही हगवणे कुटुंबियांकडून मारहाण व छळ झाला असल्याचं समोर आलं आहे. तिने स्वतः संपूर्ण प्रकार उघड केला. (mayuri jagtap on hagawane family)
माझ्या नवऱ्याने मला माहेरी सोडलं
मयुरीने प्रसार माध्यमांशी बोलताना हगवणे कुटुंबियांचा खरा चेहरा समोर आणला. ती म्हणाली, “मी घर सोडण्याची भूमिका कधीच घेतली नाही. माझ्या नवऱ्याने मला इथे (माहेरी) आणून सोडलं. ते खूप क्रुर वृत्तीचे लोक आहे. ते मला जिवंतही ठेवणार नाहीत. हे त्यांच्या मुलालाही चांगलं माहित आहे. माझ्या आईकडे मी सुखरुप राहिन म्हणून त्यांनी मला आईकडे आणून सोडलं. मुळातच आम्ही दोघं नवरा-बायको एकाच घरात वेगळं राहत होतो. घरामध्येच बाहेरच्या बाजूला एक रुम आहे तिथे राहत होतो. पण आम्ही दोघं वेगळा फ्लॅट घेऊनही राहणार होतो. वेगळ्या रुममध्ये राहून मी दीड वर्ष संसारही केला”.
वैष्णवीचा खूप छळ केला
वैष्णवीबद्दलही तिने भाष्य केलं. मयुरी म्हणाली, “ते लोक तितके वाईट वागू शकतात. पण आतल्या गोष्टी मला फार कळाल्या नाहीत. तेथील कामगार मला वैष्णवीला मारहाण वगैरे होते याबाबत सांगायचे. ती माझी सख्खी जाव असून आम्ही दोघी दोन वर्षात कधीही बोललो नाही. माझी नणंद व दीराकडून वैष्णवीला कायमच जाच झाला आहे. माझा नवरा तिच्या नवऱ्याला बोलायचा की, तिला एवढा त्रास देऊ नका. पण तो म्हणायचा की, तुम्ही आमचं नको तुमच्या दोघा नवरा-बायकोचं बघा. माझ्या नवऱ्यावरही शशांक हगवणेने खोटे आरोप केले होते. कायतरी आहे तुझं म्हणून तू माझ्या बायकोची बाजू घेतो असं नवऱ्याला बोलायचे. आम्ही तिचा त्रास बघत होतो पण काहीच करु शकलो नाही. माझी सासू आहे ती आमच्या हॉलमधील झोपाळ्यावर बसून वैष्णवीच्या आईशी फोनवर बोलत होत्या ते मी ऐकलं होतं. फॉर्च्युनर पाहिजे, सगळ्या ब्रँड गाड्या असलं की, चांगलं दिसतं. हे सासूबाई वैष्णवीच्या आईला बोलताना मी स्वतः ऐकलं होतं”.

मला मारलं, कपडे फाडले आणि…
“शशांक हगवणे तर वैष्णवीच्या वडिलांकडे सगळंच मागायचा. मोबाईल, गॉगल, घड्याळ हे माझ्यासमोर घरात आलेलं मी बघितलं आहे. माझ्या नवऱ्यालाही तो यावर रुबाब दाखवायचा. बघ मी तिला कसं धाकात ठेवलं आहे असं बोलायचा. तू कशाला तुझ्या बायकोचं ऐकतो?, तू बायल्याच आहेस असंही शशांक म्हणायचा. घरचे तसेच शशांकचे मित्रही माझ्या नवऱ्याला त्रास द्यायचे. शशांक त्याच्या मित्रांनाही सगळं सांगायचा”. मयुरीचे तर कपडे फाडण्यात आले. ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याला त्रास देत असताना मी त्यांच्यामध्ये बोलली. तेव्हा मला माझ्या सासऱ्यांनी मारलं, कपडे फाडले. नणंदेनेही मला मारलं. सासूनेही तितकीच मारहाण केली. माझा दीर शशांक हगवणेने मला खाली पाडून केस ओढले. हातातला मोबाईल घेतला. रेकॉर्डिंग सुरु आहे याची कल्पना त्याला आली. तो मोबाईल काढून घेण्यासाठी मी त्याच्या मागे पळत होती. हगवणे कुटुंबीय राजकारणी असल्यामुळे पोलिसांवरही दबाव आणायचे”. प्रतिष्ठीत कुटुंबातील हा धक्कादायक प्रकार ऐकून सगळेच हादरले आहेत.