Vaishnavi Hagawane Death Case : सासरच्यांकडून छळ आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अवघ्या २३व्या वर्षी वैष्णवी हगवणेने स्वतःचं जीवन संपवलं. मात्र वैष्णवीची हत्या करण्यात आली असल्याचे आरोप वारंवार होत आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबियांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. वैष्णवी प्रकरण संतापलं असताना आता दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे. हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीसह मोठी सून मयुरी जगतापचाही मानसिक व शारीरिक छळ केला. मयुरीने हगवणे कुटुंबियांची धक्कादायक माहिती सगळ्यांसमोर आणली. आता तिची आई व भावाने सहा महिन्यांपूर्वी राज्य महिला आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. (Mayuri Jagtap Letter to State Women Commission)
तब्बल सहा महिन्यांपूर्वी मयुरीला होणारा त्रास तिच्या आई व भावाने पत्राद्वारे मांडला होता. मात्र या पत्राकडे महिला आयोगाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाकडे लक्ष का दिलं नाही?, त्यांचा दोष आहे का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. या पत्रामध्ये मयुरीच्या आईने अनेक दावे केले आहेत. तसेच मयुरीला सासरच्यांकडून होणारा त्रास तसेच तिच्यासह घडलेले प्रकार नमुद केले आहेत. वैष्णवीचा पती शशांकनेही मयुरीला मारहाण केली असल्याचं पत्राद्वारे सांगण्यात आलं आहे.
मयुरीच्या आईने पत्राद्वारे हगवणे कुटुंबाविरोधात नमुद केलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे…
१) २० मे २०२२मध्ये लग्न मयुरीचं सुशील हगवणेबरोबर लग्न झालं. लग्नानंतर सासरे राजेंद्र व सासू लता पैसे व फॉर्च्युनर गाडीसाठी मयुरीकडे मागणी करु लागले. दरम्यान त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे मारहाण करु लागले.
२) सासू-सासऱ्यांसह दीर शशांक व नणंद करिश्माही मयुरीला मारहाण करत होती.
३) वडील, अपंग भाऊ, आईला मारहाण करु, आमच्याकडे बंदुक आहेत अशा धमक्या हगवणे मयुरीच्या कुटुंबियांना वारंवार देत होते. आमच्यामागे राजकीय पाठिंबा आहे असंही हगवणे वारंवार म्हणत होते. मुळशी येथील पौंड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी या प्रकरणात समजावून सांगत प्रकरण तिथेच थांबलं.
४) मयुरीला तिचे पती सुशीलने कायमचं सोडून द्यावं म्हणून सासू व सासरे हट्ट करत होते. मात्र पती सुशील या सगळ्याला नाकारत होता. मुलाचा राग हगवणे कुटुंबिय मयुरीवर काढत होते.

५) मयुरीचे पती सुशील घरी नसताना तिला सासू, सासरे, दीर व नणंद यांनी बेदम मारहाण केली. अश्लीलतेचा तर कळसच गाठला. सासऱ्यांनी मयुरीच्या छातीला हात लावला. दीराने शरीराच्या प्रायव्हेट जागेवर लाथ मारली. तुला मुलगा होत नाही तर तू आमच्याकडे ये, असं घाणेरड्या शब्दांत मयुरीला बोलले. शिवीगाळ केली.
६) मयुरी हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होती. रेकॉर्डिंग तिने सुरु ठेवलं होतं. मयुरी रेकॉर्डिंग करत असल्याचा संशय दीर शशांकला आला.
७) दरम्यान शशांकने मयुरीचा मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईल हातात घेऊन तो पळत होता. मयुरीही फाटलेल्या कपड्यांमध्ये त्याच्यामागे धावत होती. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका लेकीच्या आईने व भावाने लिहिलेलं हे पत्र खरचं वेदनादायी आणि विचार करायला लावणारं आहे.