Bsf Women India Pakistan War : भारत-पाकिस्तानमधील युद्धामुळे सध्या सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. या युद्धाला पूर्णविराम मिळाला हे समोर आलं असलं तरी पाकिस्तानने कुरघोडी करणं काही थांबवलेलं नाही. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान विरोधात खूप मोठं पाऊल उचललं. आणि यशस्वी ऑपरेशन सिंदूर ही मोहीम आखत पाकला चांगलीच अद्दल शिकवली. या दरम्यान भारतीय सैन्यांनी महत्त्वपूर्ण बाजू सांभाळली. स्वतःच्या कुटुंबाचा, स्वार्थाचा कसलाही विचार मनात न आणता त्यांनी या लढ्यात आपले सर्वस्व अर्पण केले. दरम्यान, काही जवानांच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना कामावर परतावे लागले. सध्या सैनिकांचे भावुक करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आणि समस्त भारतीय हे व्हिडीओ पाहून या जवानांना सलामी देत आहेत.
दरम्यान, ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने गेली १२ वर्षे बीएसएफमध्ये काम करणाऱ्या महिला जवानाची खास भेट घेत त्यांच्या निर्णयाचं कौतुक केलं. १५ दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या या महिला जवानाला केवळ आठ दिवसांतच आपल्या एक वर्षाच्या बाळाला सोडून जावे लागले. एका आईने देशसेवेचे पहिलं कर्तव्य निभावलं यासाठी सर्वत्र कौतुक होत आहे. अमरावती येथे राहणाऱ्या रेश्मा इंगळे या गेली १२ वर्षे बीएसएफमध्ये कार्यरत आहेत. या महिला जवानाने देशासाठी घेतलेला निर्णय लक्षवेधी आहे. पंधरा दिवसांची सुट्टी घेऊन लेकरांना भेटायला परतलेल्या या महिला जवानाला आठ दिवसांतच देशसेवेसाठी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. घराची जबाबदारी, लेकराचे प्रेम, कौटुंबिक जबाबदाऱ्या या सर्व गोष्टी बाजूला सारुन स्वार्थाचा विचार न करता ही महिला अधिकारी देशसेवेत परतली.
आणखी वाचा – उत्तरप्रदेशमधील पालकांचा अभिमानास्पद निर्णय, १७ नवजात मुलींची नावं ठेवली ‘सिंदूर’ कारण…
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना बीएसएफ जवान रेश्मा म्हणाल्या, “मी गेली १२ वर्षे बीएसएफमध्ये कार्यरत आहे. सुरुवातील गुजरात येथील भुज येथे माझं पोस्टिंग झालं होतं. आता पंजाब येथे माझं पोस्टिंग झालं आहे. मला माझ्या बाळाला सोडून जाताना खूप दुःख होत आहे. पण आमची आज देशाला गरज आहे त्यामुळे बाळाला सोडून जाताना वाईट वाटतंय. पण आम्हाला याचा अभिमानही आहे की आम्ही देशसेवा करत आहोत. भारत-पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्हाला फोन कॉल्स आले की तुमची सुट्टी रद्द करण्यात आली आहे आणि तुम्हाला परत कामावर परत यावे लागणार आहे. तेथील परिस्थिती पाहता बाळाला बरोबर घेऊन जाणेही शक्य नाही. त्यामुळे माझ्या या बाळाला सासू-सासऱ्यांकडे आणि पतीकडे सोडून कर्तव्याचे पालन करायला जात आहे”.
आणखी वाचा – मालिकांमधील सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार आई, बेबी बंप दाखवत शेअर केले फोटो, सुंदर लूकने वेधलं लक्ष
पुढे त्या म्हणाल्या, “युद्धाला पूर्णविराम मिळालं असं कानावर आलं असलं तरी पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या मार्गाने हल्ले करत आहे. त्यामुळे शांत बसून न राहता पाकिस्तानला प्रतिउत्तर दिले गेलेच पाहिजे. आणि म्हणूनच आमच्या सुट्ट्या रद्द करुन आम्हाला कामावर परत बोलावण्यात आले आहे. गेली १२ वर्ष मी ड्युटी करत आहे पण अशी परिस्थिती कधी आली नाही. पण आजची परिस्थिती पाहता आपण त्यासाठीच वर्दी घातली आहे, हे विसरुन चालणार नाही”. बीएसएफमध्ये कार्यरत असणाऱ्या रेश्मा इंगळे यांना त्यांच्या सासरच्या मंडळींचा खूप पाठिंबा आहे. त्यांच्या देशसेवेची कर्तव्यासाठी पतीने प्रायव्हेट बँकमधील मॅनेजर पदाला राजीनामा दिला. आणि बाळाला सांभाळण्याचे ठरवले. पतीची मिळालेली ही साथ रेश्मा यांना त्यांचे कर्तव्य पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.