Usha Nadkarni Son : अभिनेत्री उषा नाडकर्णी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने आजवर तिच्या अभिनयानं रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. हिंदी, मराठी सिनेसृष्टीत महत्त्वपूर्ण कामगिरी करत तिने कायमच आपला सिनेसृष्टीत आपला ठसा उमटविला. वयाच्या ७९ व्या वर्षी उषा नाडकर्णी या एकट्याच राहतात. त्या त्यांचा भावा, बहिणीबरोबर राहत होत्या मात्र त्यांच्या निधनानंतर आता त्या एकट्याच राहत असल्याचा खुलासा त्यांनी मुलाखतींद्वारे केला. तर त्यांचा मुलगा हा त्याच्या बायको, मुलीबरोबर परदेशात राहतो. अधिक वय असताना त्यांना एकटेपणाची सल सतावत आहे, याबाबत त्यांनी अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या भेटीदरम्यान भाष्य केलं.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी म्हणाल्या होत्या की, “मला जोपर्यंत होईल तोपर्यंत मी काम करणार. माझं तर म्हणणं आहे की, मला काम करताना मरण आलं पाहिजे. त्यातच मला मज्जा येईल”. उतरत्या वयात हा एकटेपणा आणखीनच त्यांच्या अंगावर येतो. मात्र याबाबत जराही तक्रार न करता सगळं त्यांनी आनंदाने स्वीकारलं आहे. मुलगा त्यांच्यापासून दूर परदेशात राहतो, आणि त्याला त्याचा संसार आहे, असंही त्या म्हणाल्या. यावरुन मुलगा आणि त्यांच्यात काही वाद तर नाही ना असा प्रश्न सतावत आहे.
अशातच उषा नाडकर्णी यांच्या मुलाचा अभिषेकचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या आईबद्दल एक खळबळजनक खुलासा केला होता. उषा नाडकर्णी यांचा मुलगा अभिषेक ‘बिग बॉस मराठी’च्या फॅमिली वीकमध्ये पहिल्यांदाच जगासमोर आला. त्यानंतर त्याने ‘बॉलीवूड स्पाय’ला एक मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, “आईने मला ‘बिग बॉस’ विषयी काहीच सांगितलं नव्हतं. ती फक्त मला म्हणाली की मी तीन महिन्यांसाठी बाहेर जाते. मी तिच्याकडून माहिती काढायचा प्रयत्न केला की ती नेमकं कुठे जाते , कोणता सिनेमा करत आहे का? कोणता शो आहे का किंवा आणखी कुठे जाते? याबात तिने मला काहीच सांगितल नाही”.
पुढे तो म्हणाला, “एक दिवस अचानक मी ‘कलर्स मराठी’ बघत होतो तेव्हा मला ‘बिग बॉस’ मराठीचा ट्रेलर दिसला. तो पाहिल्यावर मी रात्रभर त्याबद्दल विचार करत होतो. मी ‘बिग बॉस’चा रिसर्च केला तेव्हा मला कळलं की, हा शो १०० दिवसांचा म्हणजेच जवळपास तीन महिन्यांचा आहे. तेव्हा मला समजलं की आई तिकडे चालली आहे. मी तिला खोदून विचारलं तेव्हा तिने मी ‘बिग बॉस’मध्ये जाते असे सांगितलं”. अखेर तो म्हणाला, “मी तिला विचारलं की तुला खरंच हे करायचं आहे का? कारण ‘बिग बॉस हिंदी’चा पहिला किंवा दुसरा सीजन मी पाहिला होता त्यामुळे मला माहिती होतं त्यात काय असतं, त्यामध्ये कसे टास्क असतात, कोणत्या तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळेच या वयात आईने हा शो करणं मी स्वीकारू शकत नव्हतो. ‘बिग बॉस’मध्ये जाऊ नको हे मी तिला सांगितलं होतं पण तिने एकदा ठरवलं की ठरवलं. मग आपण काही करु शकत नाही”.