‘चार दिवस सासूचे’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘उंच माझा झोका’ अशा अनेक मालिकांतून, तसेच विविध नाटक व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे कविता मेढेकर. सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत भुवनेश्वरीची भूमिका साकारत आहेत. आजवर अनेकदा सकारात्मक भूमिकांतून घराघरांत पोहोचलेल्या कविता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून भुवनेश्वरी या नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. नकारात्मक भूमिका असूनही कविता यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. (Kavita Medhekar completed helper girl education)
आपल्या अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या कविता या त्यांच्या सोज्वळ व मदतनीस स्वभावासाठीही तितक्याच ओळखल्या जातात. अशातच त्यांनी नुकतीच आरपारला मुलाखत दिली, ज्यात त्यांनी त्यांच्याकडे घरकामात मदत करणाऱ्या एका मुलीचे शालेय शिक्षण पूर्ण केलं. याबद्दल कविता यांनी असं म्हटलं की, “माझ्याकडे एक मुलगी होती, जिने सातवीमध्येच शाळा सोडली होती. ती खूप हुशार मुलगी होती. तर मला असं वाटलं की तिने शिकलं पाहिजे. तर मी तिला एकदा म्हटलं की, “तू शिकशील का गं?”, तर ती म्हणाली, “अहो सातवीतच शाळा सोडली आहे”. त्यावर मी तिला म्हटलं की, “काय हरकत नाही. तुझी इच्छा असेल तर आजही शिकू शकतेस”. मग तीदेखील “हो ताई मला आवडेल शिकायला” असं म्हणाली”.
यापुढे त्या म्हणाल्या की, “मी तिच्यासाठी शिक्षक ठेवला होता. वाशीला वगैरे जाऊन मी तिचा परीक्षेचा फॉर्म भरला होता आणि त्या मुलीने सातवीत शाळा सोडूनही दहावीला ५८ टक्के मार्क्स मिळवले. त्या वर्षभरात माझ्या घरी दुपारच्या वेळी तिला शिकवायला शिक्षक येत असत. तर माझ्या मुलांचं सगळं आवरुन ती मुलगी अभ्यासाला बसायची. मला ते वातावरण इतकं आवडायचं की, मला त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळायची. राणी अभ्यासाला बसायची म्हणून मग माझ्या स्वयंपाकाच्या बाई तिला मदत करायच्या जेणेकरुन तिला अभ्यासाला जास्तीचा वेळ मिळेल”.
आणखी वाचा – महागड्या Birthday Gift साठी संतोष जुवेकर कुशल बद्रिकेला मॉलमध्ये घेऊन गेला पण…; घडलं काही भलतंच, Video Viral
यापुढे कविता यांनी असं सांगितलं की, “केर काढणारी बाईही तिला अभ्यासाला वेळ मिळवा म्हणून मदत करायची. त्या मला म्हणायच्या की, “तुम्ही तिच्यासाठी इतकं करत आहात तर आम्हीही थोडं करतो”. तर घरात असं वातावरण असताना हेच संस्कार आपल्या मुलांवरही नकळतपणे होत असतात. अशी चांगली माणसं मला मिळत गेली”. दरम्यान, कविता मेढेकर या त्यांच्या अभिनयासाठी नेहमीच कौतुकास पात्र ठरतात. पण त्यांनी केलेली ही मदतही त्यांच्या कौतुकाचे आणखी कारण बनली आहे.