Ambat Shaukin Movie Trailer : सध्या मराठी सिनेसृष्टीत चित्रपटांची रांग लागली आहे. विविध आशयाचे आणि प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करणारे अनेक चित्रपट रसिकांच्या भेटीस येताना दिसत आहेत. अशातच बरेच दिवसांपासून चर्चेत असलेल्या आंबट शौकीन या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी सांगणाऱ्या ‘आंबट शौकीन’चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ललित, वरूण आणि रेड्डी हे तीन खट्याळ मित्र दिसत असून ते हसवण्याबरोबरच विचार करायलाही भाग पाडत आहेत. प्रेम, मैत्री, सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत हरवलेली ओळख व मानसिक गुंतागुंत हे सगळे या सगळ्याची मांडणी चित्रपटात करण्यात आली आहे.
आता चित्रपटात या तीन मित्रांच्या आंबटपणामुळे त्यांच्या आयुष्यात काय वादळ येणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. ‘हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट’, ‘एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स’, ‘लॅब्रोस एंटरटेनमेंट’ आणि ‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ चे दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले आहे. येत्या १३ जून २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात पूजा सावंत, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत, राहुल मगदूम यांच्यासह अनेक मातब्बर कलाकार झळकणार आहेत.
दिग्दर्शक निखिल वैरागर चित्रपटाबाबत म्हणतात की, “’आंबट शौकीन’ ही फक्त मैत्री आणि प्रेम यांची धमाल गोष्ट नसून हलक्याफुलक्या व हास्यविनोदाच्या माध्यमातून मांडलेली अशी कथा आहे, जी आजच्या तरुणांच्या वास्तवाशी जोडलेली आहे. सोशल मीडियामुळे घडणारे भावनिक गुंतागुंतीचे परिणाम आणि त्यावर भाष्य करताना प्रेक्षकांना मनोरंजनातही अंतर्मुख करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे”.
या चित्रपटाच्या हटके पोस्टरने साऱ्यांचं लक्ष वेधलं. प्रत्येक कलाकाराने डोळ्यावर पट्टी ठेवून आता लवरे लागणार असं लिहिलेली पाटी हातात घेत पोस्ट शेअर केल्या आहेत. तेव्हापासून हा नवा कोरा आंबट शौकीन हा चित्रपट काय आहे, थोडीशी बोल्ड असलेली भाषा नेमकी का वापरलीय असे अनेक प्रश्न पडले आहेत ट्रेलरवरुन चित्रपटाची कन्सेप्ट समजली असून आता हा चित्रपट नेमका काय आहे हे १३ जून रोजी चित्रपटगृहात गेल्यावरच कळेल.