Devmanus Movie Poster : सध्या सिनेविश्वात एकामागोमाग एक आशयघन चित्रपट येत आहेत. या आशयघन चित्रपटांची लाट आली असून प्रेक्षकवर्गांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच आता एका नव्याकोऱ्या चित्रपटाने यांत सहभाग घेतला आहे. या चित्रपटामध्ये ‘देवमाणूस’ या मराठमोळ्या चित्रपटाची एंट्री झाली आहे. नुकतेच या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स समोर आले आहेत. या पोस्टरमध्ये चित्रपटात कोणते कलाकार असणार हे उघड झाले आहे. समोर आलेल्या पोस्टरवरुन चित्रपटात तगडी स्टारकास्ट असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे साऱ्यांना आता चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय चित्रपटातील कलाकारांचे लूक बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात असल्याचं भासवत आहेत त्यामुळे याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.
तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि ‘लव रंजन’ आणि ‘अंकुर गर्ग’ निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि नुकतेच या चित्रपटात असलेल्या कलाकारांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके ही कलाकार मंडळी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. दिग्गज आणि पॉवरहाऊस कलाकारांचे वैशिष्ट्य असलेले पोस्टर चाहत्यांना सिनेमात असलेल्या त्यांच्या प्रभावशाली स्वरुपाची एक झलक देतात जे नक्कीच उद्या प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘देवमाणूस’ टीझरच्या अपेक्षा वाढवतात.
प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये आपण चित्रपटाच्या मुख्य पात्रांचे अतिशय मोहक फर्स्ट लूक पाहायला मिळत आहेत. अभिनेते महेश मांजरेकर यांचा खूपच साधा पण इंटेन्स लूक आपल्याला दिसून येतो, त्यांची भेदक नजर त्यांच्या या भूमिकेची गंभीरता सांगत आहे. तर अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा मायाळू, सरळ देखावा आणि मनमोहक लूक लक्ष वेधून घेणारा आहे तर सुबोध भावे यांना पोलिसांच्या हटके भूमिकेत पाहणं रंजक ठरतंय. तसेच अभिनेता सिद्धार्थ बोडके त्याच्या हसण्याने सिनेमाचं आणि त्याच्या भूमिकेचं रहस्य वाढवणार असल्याचं पोस्टरवरुन स्पष्ट होत आहे. अशा या अनोख्या पोस्टरमुळे उद्या टीझरमध्ये नक्की काय असणार आहे याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
‘लव फिल्म्स’ प्रस्तुत ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले आहे. ‘लव रंजन’ आणि ‘अंकुर गर्ग’ निर्मित हा चित्रपट आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.