tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेली १६ वर्ष अविरतपणे ही मालिका सुरु असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. या मालिकेचा जगभरात खूप मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्राची स्वतःची अशी ओळख आहे. मालिकेतील कलाकारांना त्यांच्या भूमिकांमुळे नवी ओळख मिळाली आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. जेठालाल, तारक मेहता, टप्पू, टप्पू सेना, सोढी, चंपक चाचा, आत्माराम तुकाराम भिडे या पात्रांनी तर रसिकांच्या मनात घर केलं. या मालिकेतील आत्माराम तुकाराम भिडे अर्थात मंदार चांदवडकर यांच्या पात्रांची रसिकांमध्ये नेहमीच क्रेझ पाहायला मिळाली. त्यांचं भिडे मास्तर हे पात्र विशेष गाजलं.
भिडे मास्तरांनी रसिकांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मी गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी हे त्यांचं वाक्य प्रत्येक घरात ज्ञात आहे. सोशल मीडियावरही मंदार बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच मंदार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ते बायकोसह रील व्हिडीओ बनवताना दिसत आहेत.
अशातच मंदार यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मंदार चांदवडकर पेरुच्या शेतात बायकोसह व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ते असं म्हणताना दिसत आहेत की, “नमस्कार मंडळी, पेरु देशात जाईन तेव्हा जाईन. पण, आपल्या देशातल्या पेरुच्या बागेत मी आलो आहे. माझ्या मागे पाहू शकता, पेरुची कलमं लावलेली आहेत. खूप छान वाटतंय. बघा शेतकरी राजाकडून किती काळजी घेतली जातेय”.
पेरुच्या शेतातील दुसरा व्हिडीओ मंदार यांच्या पत्नी स्नेहल चांदवडकर यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पेरुच्या शेतात दोघेही मकरंद अनासपुरे यांच्या ‘रानी माझ्या मळ्यामंदी’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. दोघांच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तसेच अनेक चाहते या व्हिडीओला पसंती दर्शवित आहेत. मंदार चांदवडकर यांची पत्नी स्नेहल चांदवडकरदेखील अभिनय क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकेत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.