गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. ‘वेड’, ‘महाराष्ट्र शाहीर’, बाईपण भारी देवा’ यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आता या यादीत आणखी एक चित्रपट येणार आहे, तो म्हणजे दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज व सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची मैत्री आणि सिंहगड किल्ल्याची शौर्यगाथा सांगणारा हा ‘श्री शिवराज अष्टक’ मधील पाचवा चित्रपट आहे. (Subhedar film Box Office Collection)
या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तर अनेक ठिकाणी चित्रपटाचे हाऊसफुल असल्याचे दिसून येत आहे. अशातच चित्रपटाच्या पाच दिवसांची आकडेवारी समोर आली असून चित्रपटाने पाच दिवसांत बक्कळ कमाई केली आहे.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ‘सुभेदार’ने प्रदर्शित झाल्यापासून तीन दिवसांत तब्बल ५ कोटी ६ लाख रुपयांची कमाई केली होती. पण सोमवारी चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोमवारी चित्रपटाने अवघे ७२ लाख रुपये कमावले होते. पण आज यात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी १ कोटी ५ लाखांची कमाई केली असून सहा दिवसांच्या आकडेवारीचा विचार करता, चित्रपटाने आतापर्यंत ६ कोटी ८३ लाखांची बक्कळ कमाई केली आहे. येत्या काही दिवसांत चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी वाढण्याची शक्यता अधिक आहे.
हे देखील वाचा – …म्हणून अमृता खानविलकरला ‘चंद्रमुखी’मध्ये दौलतरावाच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे नको होता, म्हणाली, “त्याऐवजी…”
‘श्री शिवराज अष्टक’मधील याआधीच्या सर्व चित्रपटांना जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पूर्ण केल्या आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून चित्रपटातील शेवटचा सीन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर थरारक सीन्स, गाणी व उत्तम दिग्दर्शन यांमुळे प्रेक्षकांनी ‘सुभेदार’ चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट कमाईचे आकडे मोडणार असल्याची शक्यता वाढली आहे.
हे देखील वाचा – ‘रंग माझा वेगळा’ मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार, कलाकारांनी शेअर केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष
दिग्पाल यांच्या ‘शिवराज अष्टक’ मालिकेतील या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसत आहेत. तर चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले आहेत. (Subhedar film Box Office Collection in five days)