Saif Ali Khan Attacked : बॉलिवूड सिनेसृष्टीत सैफ अली खानवरील हल्ल्याने खळबळ माजली होती. मात्र आता अभिनेत्याची प्रकृती ठीक असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्याला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. जेव्हा सैफ हॉस्पिटलमधून घरी पोहोचला तेव्हा त्याने पापाराझींना पोज दिली आणि हात हलवून हॅलो देखील म्हटलं. आता सैफला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटोचालकाबरोबरचे फोटो समोर आले आहेत. ऑटो ड्रायव्हर भजन सिंग राणाबरोबर सैफच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत. फोटो पाहता, सैफ मंगळवारी हॉस्पिटलमध्येच ऑटोचालकाला भेटला होता, हे स्पष्ट होत आहे. फोटोमध्ये सैफ पांढरा शर्ट आणि डेनिम जीन्स घातलेला दिसत आहे. यावेळी त्याने गडद चष्माही घातला आहे.
सैफने ड्रायव्हरच्या खांद्यावर हात ठेवला आणि एकत्र बसून त्याच्याबरोबर फोटोही क्लिक केला. सैफने ऑटो चालकाची भेट घेऊन आभार मानले. यावेळी सैफ अली खानची आई शर्मिला टागोरही त्याच्याबरोबर होती. त्यांनी ऑटो चालकाचे कृतज्ञता व्यक्त करुन नेहमी इतरांना मदत करण्याचे प्रोत्साहन दिले. सैफ अली खानने रिक्षाचालकाच्या कामाचे कौतुक केले. अशीच सर्वांना मदत करत राहा, असेही सैफ म्हणाला. तुम्हाला त्या दिवशी तुमचे रिक्षाचे भाडे देता आले नाही पण ते लवकरच तुम्हाला मिळेल, असे तो हसत म्हणाला. आयुष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर मला लक्षात ठेवा, असंही सैफ म्हणाला.
आणखी वाचा – ‘त्या’ रात्री नॅनी ठरली सैफ अली खानची देवदूत, अभिनेता घरी येताच संपूर्ण घराला रोषणाई, कपूर कुटुंबिय आनंदात

सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री एका चोराने हल्ला केला होता. त्यांच्या घरात चोर घुसले होते. या हल्ल्यात सैफवर सहा वेळा हल्ले झाले. सैफ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रिक्षाने तो लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला. खरंतर सैफच्या घरी त्यावेळी ड्रायव्हर नव्हता. त्यामुळे त्याला रिक्षाने जावे लागले. भजनसिंग राणानेच सैफ आणि त्याचा मुलगा तैमूरला त्याच्या ऑटोतून हॉस्पिटलमध्ये नेले.
ऑटो चालकाने एबीपी न्यूजशी बोलताना त्या रात्रीचा संपूर्ण प्रकार सांगितला. ड्रायव्हर म्हणाला होता, “सैफच्या मानेतून रक्त येत होते. त्याचे सर्व कपडे रक्ताने माखले होते. खूप रक्त कमी झाले होते. तो स्वतः माझ्याकडे चालत आला, त्याच्याबरोबर एक लहान मूलही होते. मला त्याला पटकन दवाखान्यात न्यावे लागले. आठ-दहा मिनिटांत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. मी तिथे गेलो आणि मला कळले की तो सैफ अली खान आहे”. एका संस्थेने ड्रायव्हर भजनसिंग राणा यांच्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक करुन त्याला ११,००० रुपयांचे बक्षीस दिले आहे.