मुंबईत सध्या ‘कोल्ड प्ले’ फिव्हर पाहायला मिळत आहे. जगप्रसिद्ध ब्रिटिश रॉक बँड ‘कोल्ड प्ले’ कॉन्सर्टचे आयोजन नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये १८, १९ व २१ जानेवारी असे तीन दिवस करण्यात आलं होतं. ‘कोल्ड प्ले’ कॉन्सर्टसाठी देशभरातील हजारो संगीतप्रेमी डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर नवी मुंबईत आले होते. यावेळी क्रिस मार्टिननं सगळ्याच संगीतप्रेमींचं मन जिंकलं. या सांगीतिक मैफिलीसाठी अवघ्या संगीतप्रेमींनी हजेरी लावली होती. या सांगीतिक मैफिलीचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. या संगीतीक मैफिलीसाठी अभिनेता रितेश देशमुखनेही खास हजेरी लावली होती. (riteish and genelia deshmukh coldplay live concert)
रितेश देशमुख हा अभिनेता सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. रितेश पत्नी जिनीलियाबरोबरचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. तसंच अनेकदा हे डोगे एकमेकांनबरोबरचे रोमॅंटिक फोटोही शेअर करत असतात. त्याच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही उत्तम प्रतिसाड मिळत असतो. अशातच रितेशनेही नुकतीच मुंबईतील ‘कोल्ड प्ले’च्या सांगीतिक मैफिलीला हजेरी लावली होती आणि याचे खास क्षण त्याने आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. ‘कोल्ड प्ले’च्या सांगीतिक मैफिलीसाठी रितेशसह त्याची पत्नी म्हणजेच जिनीलिया व त्यांची दोन्ही मुलं रियान व राहील हेही पोहोचले होते.
रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कोल्ड प्लेच्या लाईव्ह कॉन्सर्टचे काही खास क्षण शेअर केले आहेत. यापैकी पहिल्या स्टोरीमध्ये त्याने तिरंगा शेअर करत “कायम लक्षात राहणारी एक रात्र” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या स्टोरीमध्ये तो आपल्या दोन्ही मुलांसह कॉन्सर्टचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिसऱ्या स्टोरीमध्ये त्याने “माझे सासरे कोल्ड प्ले सोबत गाण्यासाठी त्यांच्या गीतांसह तयार होते” असं म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे. तर पुढे त्याने आणखी काही व्हिडीओ शेअर करत “Epic” असं म्हटलं आहे.
याशिवाय जिनीलियानेदेखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कोल्ड प्लेच्या लाईव्ह कॉन्सर्टचे काही खास क्षण शेअर केले आहेत. यासह तिने “काय शो होता… काय ठिकाण होते… आणि हे सगळं मी माझ्या रितेश, रिआन व राहील यांच्याबरोबर एन्जॉय केलं. मी आणि रितेशने २०१६ मध्ये एकत्र कोल्ड प्लेची लाईव्ह कॉन्सर्ट अनुभवली होती. त्यानंतर आता २०२५ मध्ये आम्ही याचा पुन्हा एकदा आनंद घेतला. कोल्ड प्ले तुम्ही मुंबईत पुन्हा एकदा येण्याची आम्ही वाट बघत आहोत” असं म्हटलं आहे.