पूर्वीच्या हिंदी पिक्चरमध्ये एक हुकमी डायलॉग होता, वक्त बदलने मे देर नहीं लगती….’अगदी तस्सेच झालयं बघा. वर्षभरापूर्वी कोणी फिल्मी ज्योतिषाने कुंडली मांडून सांगितलं असते, २०२३ मध्ये झी मराठी गौरव इव्हेन्टस, Nmaccचे अर्थात जियो एन्टरटेन्मेन्टचे ग्लॅमरस उदघाटन, एक म्युझिकल रिॲलिटी शो, एका माध्यम समूहाचा इव्हेंट्स, आयपीएल क्रिकेटचे भव्य स्टेडियमवर दणदणीत उदघाटन यात एक सेलिब्रिटीज काॅमन असेल आणि चक्क ‘चंद्रा’ या सुपर हिट मराठी लावणीपासून ऑस्कर विजेत्या ‘नाटू नाटू’पर्यंत आकर्षक नृत्य करणारी अभिनेत्री एकच असेल असे कोणाला वाटलं तरी होतं का? मगर आदमी सोचता कुछ और है और होता कुछ और है असा रंग बदलत चाललाय बघा.(Rashmika Mandana In Bollywood)
रश्मिका मंदाना चारो तरफ छा जा रही है. एव्हाना तुम्हीदेखील तिचे फॅन्स फाॅलोअर्स झाला असाल. आणि का होऊ नये? ऐवीतेवी दशकभर तेच तेच चेहरे पाहून आता अतिपरिचयावज्ञा ( अतिपरिचय) झाली आहे. सोशल मिडियाने पडद्यावरचे स्टार घरात आणि हातात (अर्थात मोबाईलवर) आलेत आणि आकर्षणातील अंतरच ओसरले. सुखद बदल हा अलिखित नियमच आहे. मनोरंजन क्षेत्रात तो कधीही, कसाही निर्माण होतो आणि जो बदल रसिकांना आवडतो तो क्लिक होतोच.

‘पुष्पा’ने तमिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम व हिंदीत जबरदस्त धुमाकूळ घालताना ‘फायर हू मै’ डाॅगलाॅग व स्टाईलसह श्रीवल्ली ( रश्मिका मंदाना) व सामे सामे ही दोन्ही गाणी रेकॉर्ड ब्रेक हिट झाली. आणि रश्मिका मंदानाचे २०१६ पासूनच्या कन्नड व तेलगू भाषेतील चित्रपटांचे अन्यभाषिक चित्रपट रसिकांनी गूगलवर सर्चिंग वाढवले आणि रश्मिका मंदानाचे ‘किरीक ‘ ( कन्नड पिक्चर) पासूनचे पडद्यावरचे व फोटो सेशनचे फोटो लाईक्स करणे वाढवले. सिनेमाच्या जगात यश हेच सर्वात मोठे चलनी नाणे असल्याने ‘पुष्पा ‘ हिटने बरेच काही घडलं आणि घडायलाही हवे. तरचं ‘पिक्चरच्या जगात ‘ नवचैतन्य राहिल. एव्हाना रश्मिका मंदाना विकास बहेल दिग्दर्शित ‘गुडबाय ‘मधून हिंदीत आली. हा चित्रपट अमिताभ बच्चनमुळे फोकसमध्ये राहिला.

फिल्डवरच्या तमाम फोटोग्राफर्सना रश्मिका मंदानाच्या ग्लॅमरस रुपाची जादू पटकन लक्षात आली. ती एकाद्या इव्हेन्टसला येऊ देत अथवा विमानतळावर येऊ जाऊ देत, धडाधड फ्लॅश उडू लागले. रिल्स तयार होऊ लागली. ( विमानतळावरचे कव्हरेज हे यशाचे एक बॅरोमिटर आहे यावर एकदा झक्कास फोकस टाकूच.) आपल्यावरचे लक्ष वाढतेय हे लक्षात येताच रश्मिकाही हवे तेवढे फोटो काढून देऊ लागली. स्टारने ही सवय आपोआप लावून घ्यायची असतेच.
चारही बाजूने यश रश्मिकावर फिदा झाले जणू. झी गौरव पुरस्कार सोहळ्यात अवधूत गुप्ते व डाॅ. नीलेश साबळे यांच्या प्रश्नावर ती तेवढीच झक्कास हसली आणि जणू मराठी भाषा समजतेय अशाच थाटात स्टेजवर वावरली. शिवाय ‘नादखुळा’ असं ठसक्यात म्हणाली. ‘चंद्रमुखी’च्या चंद्रा गाण्यावरचा तिचा नृत्य हा कम्माल. अख्खा शो या परफॉर्मन्सने कमालीच्या उंचीवर नेला आणि रिपिट कव्हरेजला भरपूर स्कोप मिळाला. कितीही वेळा झी हा नृत्य तडका प्रक्षेपित करणारच. आणि टीआरपी वाढत राहणार.
रश्मिकाची वाढती क्रेझ(Rashmika Mandana In Bollywood)
आयपीएल उदघाटन इव्हेन्टस म्हणजे मोठा स्टेज, बिग एक्स्पोजर. अनेक देशांत लाईव्ह कव्हरेज. रश्मिका छा गई. श्रीवल्ली, सामे सामे, नाटू नाटू अशी सगळीच चलनी गाणी तिने आपल्या नृत्य अदांनी बहारदारपणे खुलवली. एका म्युझिकल रिॲलिटी शोमध्ये गोविंदाला नाचवले. तर एका इव्हेन्टसमध्ये सलमान खानला ठेका धरायला लावला. हे सगळेच नाचकाम यू ट्यूबवर वाढते व्ह्यूज मिळवतेय. रश्मिका मंदानाने नृत्यापुरतेच राहू नये. अन्यथा आयटम सॉंग डान्सर अशी इमेज निर्माण होण्याची शक्यता असते. पण तोही टाळण्याची फिल्मी संधी तिला ‘रेन्बो ‘ या तेलगू भाषेतील नायिकाप्रधान चित्रपटात मिळालीय. हा चित्रपट हिंदीत डब होईलच म्हणा.

रश्मिकाच्या प्रगतीचा वेग कम्माल आहे. फिटनेस, गुड लुकिंग, नृत्य चापल्य, आत्मविश्वास या केमिस्ट्रीने ती प्रगती करतेय. सध्या ती मुंबईच्या इव्हेन्टसमध्ये रमलीय, रुळलीय. त्यासह तिला हिंदी चित्रपटही मिळू देत. ऐंशीच्या दशकात श्रीदेवी, जयाप्रदा यांनी दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटात काम करुनच हिंदीत झेप घेत आपलं साम्राज्य निर्माण केले. गंमत म्हणजे, श्रीदेवीला बराच काळ हिंदीत येत नव्हते म्हणून बेबी नाझ तिचे संवाद डब करे. हिंदी चित्रपटसृष्टीत वैजयंतीमाला, हेमा मालिनी, रेखा, मीनाक्षी शेषाद्री अशा काही साऊथ इंडियन पर्सनालीटीनी यशस्वी घौडदौड केलीय.(Rashmika Mandana In Bollywood)
या सगळ्याजणींकडे एक काॅमन फॅक्टर आहे, तो म्हणजे बहारदार नृत्य आणि त्यासाठी स्टॅमिना आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व… रश्मिका मंदानाचा तोच प्लस पॉईंट आहे. म्हणूनच तर ती वेगाने यशस्वी ठरलीय. तुम्ही देखील एव्हाना तिचे फॅन झाला असालच. उगाच का इन्स्टावर तिचे फॅन्स वाढताहेत?
– दिलीप ठाकूर