चित्रपटसृष्टीतून पहाटे एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे आज सकाळी हैदराबाद, तेलंगणा येथे निधन झाले आहे. रामोजी राव यांचा हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. पहाटे ३.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामोजी राव यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Ramoji Rao Passed Away)
रामोजी फिल्म सिटी हैदराबादची स्थापना १९९६ मध्ये रामोजी राव यांनी केली होती. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ रोजी झाला होता. रामोजी फिल्म सिटी हा जगातील सर्वात मोठा चित्रपटांचे चित्रीकरण करणारा स्टुडिओ मानला जातो. हा स्टुडिओ भारताच्या तेलंगणा राज्यात आहे. हा स्टुडिओ एकूण १६६६ एकर परिसरात पसरलेला आहे. रामोजी स्टुडिओचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच वेळी १५ ते २५ चित्रपटांचे चित्रीकरण केले जाऊ शकते. येथे एकूण ५० शूटिंग फ्लोअर्स आहेत. आतापर्यंत या स्टुडिओमध्ये एकूण २५००० चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाहुबली’ याशिवाय ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘सूर्यवंशम’, ‘दिलवाले’, ‘नायक’, ‘गोलमाल’ यांसारख्या बॉलीवूड चित्रपटांचे चित्रीकरणही येथे झाले. याशिवाय अनेक मालिकाही येथे शूट झाल्या आहेत.
रामोजी राव यांचे मीडिया आणि भारतीय चित्रपट उद्योगात खूप मोठे योगदान आहे आणि त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन सृष्टीला नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सध्या संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. संस्थापक रामोजी राव यांच्या पार्थिवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चंद्राबाबू नायडू हैदराबादला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.