श्रावण म्हटलं की पंचपक्वान्न डोळ्यसमोर येतात. शिवाय श्रावणी सोमवारचा उपवास ही आलाच. बरं पण श्रावणातल्या अधिकमासाची उत्सुकता ही कायमच रंगलेली पाहायला मिळते. बऱ्याच वर्षांनी हा अधिकमास साजरा करण्याची संधी यंदा मिळाली आहे. यंदा हा अधिकमास सगळीकडे मोठ्या प्रमाणावर साजरा करताना पाहायला मिळतोय. अधिकमासात जावयाला घरी बोलावून त्याचा मानपान केला जातो आणि भेटवस्तूही दिली जाते. बरं हा अधिकमास साजरा करण्यात सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार मंडळीही मागे राहिलेली नाहीत. (Snehal Tarde and Pravin Tarde)
काही दिवसांपूर्वी हास्यजत्रा फेम सगळ्यांचा लाडका दादूस म्हणजेच अभिनेते अरुण कदम यांनी देखील लेकीचा व त्यांच्या जावयाचा अधिकमास स्पेशल सोहळा साजरा केला. त्यानंतर अभिनेते सचिन पिळगावकर यांचाही सासरी अधिकमास साजरा करण्यात आला. आता यांच्यापाठोपाठ आणखी एका कलाकाराने अधिकमास साजरा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा अधिकमासचा सोहळा साजरा करतानाचा एक व्हिडीओ त्यांच्या पत्नी अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे. सासरवाडीला जाऊन मानपान करून घेतानाच प्रवीण यांचा हा व्हिडीओ आहे. दरम्यान स्नेहल यांच्या आईवडिलांकडून अधिकमासाचं खास वाण प्रवीण यांना देण्यात आलेलं पाहायला मिळतंय.
स्नेहल यांनी या क्षणांचा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यात स्नेहल यांच्या आई प्रवीण यांचं औक्षण करताना दिसत आहेत. तर स्नेहल यांच्या आई प्रवीण यांच्या हातात वाणाचं ताट देताना दिसत आहेत. त्यात चांदीचं निरंजन ही भेटवस्तू त्यांनी जावयाला दिली आहे. तसेच त्यांच्यासाठी खास खाद्यपदार्थ बनवण्यात आले आहेत.
स्नेहल तरडेंनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘अधिकाचे वाण…जावईबापू…अधिकमास’ असं लिहिलं आहे. तर एकूणच प्रवीण यांचं सासरी चांगलंच कौतुक झालं आहे. स्नेहल यांनी शेअर केलेला प्रवीण यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवत कमेंट व लाईक्सचा वर्षांव केला आहे.