२२ एप्रिल संपूर्ण देशासाठी काळा दिवस ठरला. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांनी आपला जीव गमावला. या भ्याड हल्ल्याला आठ दिवस उलटून गेले आहेत. दरम्यान प्रत्येक दिवशी पहलगाम हल्ल्याबाबत नव्या गोष्टी समोर आल्या. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी अंगावर काटा आणणारे अनुभव सांगितले. पहलगाम हल्ल्याचा संताप देशभरात ताजा असतानाच सरकारकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पाकिस्तानात असलेल्या भारतीयांना दिलेल्या वेळेत भारतात येण्याचे आदेश दिले. तर भारतात असलेल्या पाकिस्तानी लोकांना त्यांच्या देशात परत जाण्यास वेळ देण्यात आला. यावेळी विविध भागांमध्ये भारत-पाकिस्तानच्या सीमेवर लोकांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी कुटुंबियांना आपल्या जवळच्या व्यक्तींपासून कायमचं दूर जावं लागलं. (indian Pakistani visa restrictions)
आम्हाला भारतातच राहू द्या अशी विनंती देशात असलेल्या पाकिस्तानी लोकांनी सरकारकडे केली. मात्र त्यांना त्यांच्या देशात परतावंच लागलं. एका आईला तीन वर्षांच्या मुलाला पाकिस्तानात पाठवावं लागलं. शिवाय जवळपास ३५ वर्ष भारतात राहिलेल्या महिलेला कुटुंबाला सोडून पुन्हा तिच्या देशात जावं लागलं. हे भावनिक युद्ध सगळ्यांनीच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला.
आणखी वाचा – Video : सात मिनिट उशीर, बायको-मुलासह खड्ड्यात लपला, त्याने अल्लाह हू अकबर म्हणताच…; पर्यटक झिपलाईन करताना…

मुलांना हृदयविकार अन् देश सोडावा लागला
मुलांच्या उपचारासाठी एक व्यक्ती पाकिस्तानमधून हैद्राबादमध्ये आला होता. एक मुलगा ९ वर्षांचा तर दुसरा ७ वर्षांचा मुलगा या व्यक्तीला आहे. त्याच्या या दोन्ही मुलांना जन्मतःच हृदयविकाराचा त्रास आहे. दिल्लीमधील रुग्णालयामध्ये पुढील काही दिवसांमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. पण त्याला आपल्या मुलांसह पुन्हा देशात जावं लागलं. या व्यक्तीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, यातापर्यंत यासाठी एक कोटी रुपये आम्हाला खर्च आला. आम्ही सरकारला विनंती करतो की, उपचार होईपर्यंत आम्हाला भारतात राहू द्या.

मुलींना घेऊन आई भारतात आली पण…
कराचीमधून ११ वर्षाची जेनब व ८ वर्षांची जेनिशा आईसह दिल्लीमध्ये त्यांच्या आजीला भेटायला आली होती. पण सरकारच्या आदेशानंतर कायद्यानुसार दोन्ही मुलींना पाकिस्तानामध्ये परत जावं लागणार आहे. तर त्यांची आई भारताची नागरिक असल्यामुळे तिला इथेच थांबावं लागणार आहे. मुलगी जेनबने रडत सांगितलं की, “आईला सोडून जाणं खूप कठीण आहे. आईला पुन्हा पाकिस्तानात पाठवण्यासाठी नकार देण्यात आला आहे. दहशतवाद्यांवर कारवाई करा. पण आमच्यासारख्या निष्पाप लोकांना यामध्ये त्रास देऊ नका”.
पत्नीला माहेर घेऊन आला आणि…
मोहम्मद इरफान पत्नी नबीला व मुलांसह भारतात आले होते. आता मुलांसह ते पुन्हा पाकिस्तानात गेले. मात्र पत्नीला त्यांना इथेच सोडावं लागलं. कारण ती आधीपासूनच भारताची नागरिक आहे. या कुटुंबाने म्हटलं की, “दहशतवाद्यांनी आमचं कुटुंबच उद्धवस्त केलं आहे. नरेंद्र मोदी यांना आम्ही विनंती करतो की, आमची मदत करा. मुलं आईशिवाय राहू शकत नाहीत”.

३५ वर्ष भारतात राहणारी सरदा बाई
ओडिशाची बोलांगीरमध्ये सरदा बाई ३५ वर्ष भारतात राहत होती. आता तिला पुन्हा पाकिस्तानात जावं लागलं. भारतातील हिंदूबरोबर तिने लग्न केलं होतं. तिचा मुलगा व मुलगी भारतीय आहे. त्यांच्याजवळ वोटर आयडी सारखे कागदपत्रही आहेत. मात्र भारतीय नागरिक म्हणून मान्यता अजूनही मिळालेली नाही.
सरदाने सरकारकडे विनंती केली. ती म्हणाली, “माझं पाकिस्तानात कोणीच नाही. माझा पासपोर्टही खूप जुना आहे. माझी मुलं, नातवंडही इथेच आहेत. कृपया मला भारतातच राहू द्या”. सरकारने दिलेल्या आदेशांचं उल्लंघन केलं तर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं पोलिसांद्वारे सरदाला सांगण्यात आलं.