Nitish Chavan Troll for copy Pushpa look : मालिकांमध्ये नेहमीच नवनवीन कथा, नवनवीन प्रसंग दाखवले जातात. एखाद्या सीनसाठी प्रचंड मेहनतही घेतली जाते. रोज नवीन काय दाखवायचं हा मोठा प्रश्न प्रत्येक मालिकेसमोर असतो. अशातच नवनवीन कथानक घेऊन येत ही मालिकेची टीम प्रत्येक दिवशी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करते. बरेचदा मालिकांमधील वाढीव सीन हे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात तर काही वेळा ते पडतही नाहीत. बरेचदा नेटकरी या मालिकेला, मालिकेतील कलाकारांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, मालिकेतील कलाकार त्यांच्या उत्तम अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या या ट्रोलिंगला उत्तर देतात. अशातच आता एक मराठी मालिका ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकली आहे. ही मालिका म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’.
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत सूर्या या पात्राला अधिक वजन आहे. मालिकेत ही भूमिका नितीश चव्हाण साकारत आहे. याशिवाय अनेक कलाकारांची फौजही मालिकेत पाहायला मिळत आहे. सूर्या हा त्याच्या पाचही बहिणींवर जीवापाड प्रेम करतो. आणि त्यांच्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. मालिकेत सूर्याची बहिण प्रेग्नंट आहे. पण तिच्या पतीनं तिच्यावर हे मूल माझं नाही आहे, असे आरोप केलेले दिसत आहेत. बहिणीवर केलेल्या या आरोपांमुळं सूर्या संतापला असून त्याचं एक वेगळंच रुप पाहायला मिळत आहे.
दरम्यान, समोर आलेल्या प्रोमोमध्ये असा पाहायला मिळत आहे की, सूर्याच्या बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला दोघांनाही खरेपणाची परीक्षा द्यावी लागते. हे सगळं नाट्य घडत असतानाच सूर्या दादा गावतल्या मंदिरात देवीसमोर तांडव करताना दिसतो. यात सूर्याचा लूक पुष्पा सिनेमातल्या अल्लू अर्जुनसारखा दिसतोय. हिरव्या रंगाची साडी, गळ्यात देवीचे दागिने, कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा असा त्याचा लूक पाहायला मिळतोय. मालिकेत सूर्याने साकारलेला हा अवतार अनेकांना आवडलेला दिसत नाही आहे. अनेकांनी कमेंट करत त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
आणखी वाचा – आईला कॅन्सर पण दोन वर्षाचा लेकालाही कळतोय त्रास, दीपिका कक्करने सांगितली परिस्थिती, मुलगा रुहान म्हणाला…
‘झी मराठी’ वाहिनीवर शेअर करण्यात आलेल्या मालिकेचा हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी सूर्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. “काय पुष्पाला कॉपी केलं आहे का?”, असं एकानं म्हटलं आहे. तर, दुसऱ्यानं, “स्वस्तातला पुष्पा”, असं म्हणत डिवचलं आहे. दरम्यान, या प्रोमोवर मालिकेतून अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचंही एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे. “फालतुगिरी कलाकार पैसे मिळतात म्हणून काहीही कसे करतात”, “पुष्पासारखा सूर्या असा चित्रपट काढायला आता हरकत नाही”, “मराठी पुष्पा”, यांसारख्या कमेंट करत नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.