Operation Sindoor : भारत-पाकिस्तानमधील वाढता तणाव युद्धजन्य परिस्थितीला कारणीभूत आहे. २२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम या लोकप्रिय पर्यटन शहराजवळील बैसरन कुरणात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ जण ठार झाले आणि अनेकजण जखमी झाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरु केले. भारताने ऑपरेशन सिंदूर या मिशनची आखणी करत पाकिस्तानला चांगलीच अद्दल शिकवली.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांना त्यांच्या कुटुंबासमोर गोळ्या झाडत ठार मारले. यावेळी दहशतवाद्यांनी मुसलमान आहे का?, असं म्हणत पुरुषांवर गोळ्या झाडल्या. यावेळी अनेक महिलांनी त्यांच्या पतींना डोळ्यासमोर जमिनीवर कोसळताना पाहिले. आणि त्यांचा टाहो फुटला. आक्रोश करत या महिला मदतीची विनवणी करताना दिसल्या, मात्र त्यावेळी त्या हतबल होत्या. अनेक महिलांचे कुंकू या दहशतवादी हल्ल्यात पुसले गेले याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर हे नाव देत पाकिस्तान विरोधात नवी मोहीम आखली.
आणखी वाचा – मालिकांमधील सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार आई, बेबी बंप दाखवत शेअर केले फोटो, सुंदर लूकने वेधलं लक्ष
तर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाई, ऑपरेशन सिंदूरपासून प्रेरित होऊन, येथील १७ नवजात मुलींना त्यांच्या कुटुंबियांनी सिंदूर असे नाव दिले. कुशीनगर मेडिकल कॉलेजमध्ये १० आणि ११ मे रोजी दोन दिवसांत जन्मलेल्या १७ नवजात मुलींना त्यांच्या कुटुंबियांनी सिंदूर असे नाव दिले असल्याचे समोर आले. आणि पालकांच्या या निर्णयाचं देशभरात कौतुक होताना पाहायला मिळालं. सिंदूर ही आता केवळ मोहीम राहिली नसून ही एक भावना आहे हेदेखील या निर्णयातून समोर आलं.
आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस, सुंदर फोटोशूट करत दाखवला चेहरा, नाव आहे…
“माझी मुलगी मोठी झाल्यावर तिला या शब्दाचा खरा अर्थ समजेल आणि ती स्वतःला भारतमातेसाठी एक कर्तव्यदक्ष महिला म्हणून सादर करेल”, असं म्हणत एका पालकवर्गाने या निर्णयाबाबत भाष्य केलं. तर “पहलगाम हल्ल्यानंतर, अनेक विवाहित महिलांनी त्यांचे पती गमावले तेव्हा त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवले. आम्हाला याचा अभिमान आहे. आता, सिंदूर हा शब्द नाही तर एक भावना आहे. म्हणून आम्ही आमच्या मुलीचे नाव सिंदूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे”, असंही एका चिमुरडीच्या आईने स्पष्ट केलं.