Amol Kolhe on Rupali Chakankar : नाशिकचे वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात वातावरण ढवळून निघाले आहे. भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला उधाण आल्याचं पाहायला मिळालं. चाकणकर या खरातच्या पाया पडतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप नोंदवत आवाज उठविला. यांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षही काही मागे राहिला नाही. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट कवितेच्या माध्यमातून चाकणकर यांच्या नैतिकतेवर बोचरी टीका केली आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथावर आधारित एक कविता सादर केली आहे. या कवितेद्वारे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत कडक शब्दांत नाव न घेता चाकणकरांवर ताशेरे ओढले आहेत. महिला आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे एका वादग्रस्त व्यक्तीसमोर नतमस्तक होणे हा स्त्रीशक्तीचा अपमान आहे, ही बाब गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताड्कन तडा गेला
जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याच्या पाटील पितृतुल्य झाला!
त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली
सामाजिक, कौटुंबिक कि वैयक्तिक सारी सीमारेषाच पुसट झाली.
काठी आधाराची होती खरी, पण स्वार्गापायी मोडून पडली
न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्येची पुन्हा एकदा शिळा झाली
सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली,
गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म साऱ्या साऱ्या अक्षरधनाची अक्षरश: होळी झाली…
आणखी वाचा – हातावर मेहंदी काढणं हिना खानला पडलं महागात, रोजा न ठेवल्याने नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “ईद दोन दिवस…”
ही कविता सादर करत त्यांनी शेअर केलेल्या पोस्टला “कुरुप विचारांचा भोंदूपणा, सगळ्या नैतिकतेचंच ‘चाक’ रुतवून टाकतो… हे महाराष्ट्र आज अनुभवतोय”, असं कॅप्शन दिलं.
दरम्यान, या आरोपानंतर महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षपदावरुन रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. असं असलं तरी, अनेक विरोधी पक्षनेते रुपाली चाकणकर यांच्या विरोधात बोलत असून त्यांच्या अटकेची मागणी करत आहेत.





