Neha Shitole New Begining : लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा शितोळे आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. अभिनेत्रींनंतर नेहा लेखिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी ‘सीतारामम’ या दक्षिण भारतीय चित्रपटासाठी हिंदी संवाद लेखन केलेल्या नेहाने आता ‘देवमाणूस’ या सिनेमाच्या पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी उचलली आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ निर्मित आहे.
लेखकाच्या भूमिकेत पदार्पण करताना नेहा म्हणाली, “लेखनाची आवड मला नेहमीच होती आणि ‘देवमाणूस’साठी पटकथा आणि संवाद लेखन करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. हा चित्रपट एक थरारक कथा मांडतो आणि त्याला एक भावनिक बाजूसुद्धा आहे. अभिनेत्री या नात्याने आत्तापर्यंत भावना व्यक्त केल्या होत्या, त्यामुळेच ते सर्व लिखाणात उतरवताना आधीच्या अनुभवाची मदत झाली”.
तिने पुढे असं म्हटलं आहे की, “‘लव फिल्म्स’ने माझ्यावर विश्वास ठेवला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. तसेच दिग्दर्शक तेजस देऊस्कर यांनी मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचीही ऋणी आहे. ‘देवमाणूस’साठी लेखन करणे ही माझ्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारी संधी होती. हा प्रवास खूप आव्हानात्मक आणि त्याचबरोबर खूप समृद्ध करणारा ठरला. विशेषतः अशा प्रतिभावान टीमसह काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता”.
लव फिल्म्स प्रस्तुत, ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित हा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.