myra vaikul : मराठी मालिकाविश्वातील नेहमीच चर्चेत असणारी बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. मायराने आजवर तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. माझी तुझी रेशीमगाठ, ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकांमध्ये मायराने भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘नाच गं घुमा’ चित्रपटातही ती पाहायला मिळाली. मायरा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत असते. सोशल मीडियावर मायराचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. या व्हिडीओवर मायराला अनेक वाईट कमेंट आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत.
‘इट्स मज्जा’च्या छोट्यांच्या मोठया गप्पा या कार्यक्रमात मायराने हजेरी लावली. यावेळी मायराने खूप छान उत्तर दिली. दरम्यान, यावेळी मायरा सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत आणि ai बाबत स्पष्ट बोलली. यावेळी बोलताना मायरा म्हणाली, “कमेंट्स मला खूप येतात. मी स्पेशल जाऊन वाचत नाही पण जेव्हा मी रील पाहत असते तेव्हा मी कमेंटही बघते. अनेक वाईट कमेंट्स असतात, पण आपण आपलं काम मनापासून केलं की त्या कमेंटच काहीच वाटत नाही. आपल्याला आवडणं जास्त महत्त्वाचं आहे. आपले आणि इतरांचे विचार, मत ही वेगळी असू शकतात”.
पुढे ती म्हणाली, “मला जर का एखादी गोष्ट आवडते, जसं मला गोड आवडतं तर ते त्याला आवडत असेलच असं नाही. मला तिखट आवडतं त्याला नाही आवडत. प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. पण कधीतरी मनामध्ये असंही होतं की हे नेमकं काय आहे. जेव्हा घाणेरडे रील मी पाहते तेव्हा असं वाटतं की किती घाणेरडे रील सोशल मीडियावर टाकतात. कधी कधी वाईट कमेंट येतात पण मी तेच म्हणेन की त्यांची चॉईस ही वेगळी असूच शकते”.
ai बद्दल बोलताना मायरा म्हणाली, “माझा एक व्हिडीओ माझ्या मावशीने काढला आहे त्यात मी सुंदर अशा साडीमध्ये आहे. मी खूप छान दिसत आहे. याशिवाय काहीतरी आलेली ना घिबली की काय, किंवा ai ते सगळं भयानक आहे. मी आताच येताना एक व्हिडीओ पाहिला त्यात एका मुलीने फुल स्लिव्ह्ज घातलेला सलवार कमीजमधील फोटो ai ला दिला. ai ने तिचा साडीतील फोटो दिला आणि त्यात स्लिव्हलेस फोटो समोर आला, आणि त्यात तिला तिच्या हातावर असलेला तीळही स्पष्ट दिसत होता. म्हणजे हे अर्थात स्कॅम आहे आणि भयानक आहे”.





