Mahima Mhatre Engagement : मराठी सिनेविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. काही दिवसांपूर्वीच इशा डे, पूजा बिरारी-सोहम बांदेकर, अपूर्व नेमळेकर, अपूर्वा गोरे-अंशुमान जोशी, नंदिता पाटकर ही कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. यापाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीने साखरपुडा समारंभ उरकला असल्याचं समोर आलं आहे. छोट्या पडद्यावरील या अभिनेत्रीने थेट फोटो पोस्ट करत साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी दिली. ही अभिनेत्री म्हणजे ‘तुला जपणार आहे’ फेम मीरा म्हणजेच महिमा म्हात्रे. झी मराठी वाहिनीवरील तुला जपणार आहे मालिकेतील मीरा या पात्रामुळे महिमाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच अभिनेत्रीने साखरपुडा केला आहे.
प्रेक्षकांची ही लाडकी मीरा आता आयुष्याची नवी सुरुवात करणार आहे. अभिनेत्रीची लगीनघाई सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि अगदी थाटामाटात महिमाचा साखरपुडा समारंभ उरकला आहे. वेस्टर्न आऊटफिटमध्ये ही जोडी खूपच सुंदर दिसत होती. महिमाने अभिनेता रोशन विचारेसह साखरपुडा केला आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याने गुडघ्यावर बसून महिमाला अंगठी परिधान केली आहे. यावेळी अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा वेस्टर्न गाऊन परिधान केला होता. “we are happily engaged ” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी दिली आहे.
महिमाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या झी मराठी वाहिनीवरील तुला जपणार आहे मालिकेत आहे. यापूर्वी महिमाने ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’, ‘दार उघड बये’ या मालिकेत काम केलं. तर रोशनने ‘खरंच तुझं काय चुकलंय’, ‘दार उघड बये’, ‘तुझं माझं जमतंय’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत काम केलं आहे.





