Maitricha Saatbara Interview : ‘आठवी अ’, ‘पाऊस’, ‘दहावी अ’ वेबसीरिजच्या भरघोस यशानंतर आणखी एका वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु झाली. ती वेबसीरिज म्हणजे ‘मैत्रीचा ७/१२’. या वेबसीरिजचं पोस्टर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये याबाबत उस्तुकता होती. अखेरीस ‘मैत्रीचा ७/१२’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोशल मीडियाद्वारे तर ‘मैत्रीचा ७/१२’ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचनिमित्त या सीरिजच्या कलाकारांशी आपण गप्पा मारणार आहोत. या सीरिजमध्ये संचिता हे पात्र साकारणारी रिषिका कदम हिच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करुया आजच्या गप्पा…
अभिनयक्षेत्रात तुझी एंट्री कशी झाली?, आणि ‘मैत्रीचा ७/१२’ या वबेसीरिजसाठी तुझी निवड कशी झाली?
मी बालनाट्य करायचे. शाळेत असल्यापासून नाटक, चित्रपटांमध्ये काहीतरी करायचं असं ठरवलं. दहावी झाल्यानंतर ललित कला केंद्रात प्रवेश घेण्याचं मी ठरवलं. बारावी पर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण घेतल्यानंतर मी माझं ग्रॅड्युएशन ललित कला केंद्रात पूर्ण केलं. एकेदिवशी मला माझा मित्र विनीतचा फोन आला आणि त्याने ‘मैत्रीचा ७/१२’ वेबसीरिजबद्दल मला थोडक्यात माहिती दिली. या वेबसीरिजबाबत मला त्याच्याकडून जेवढी माहिती मिळाली त्यावर विचार करता टेलिव्हिजनवरील सासू-सूनांच्या रोजच्या कारस्थानांपेक्षा मी काहीतरी वेगळं करायला मिळतंय म्हणून ही सीरिज करायचं ठरवलं. आणि मी ऑडिशन द्यायचं ठरवलं. ऑडिशन दिल्यांनतर मला सिलेक्शन झाल्याचा फोन आला. साताऱ्यात या वेबसीरिजच शूटिंग होतं म्हणून थोडं दडपण आलं होतं पण मी तिथेच राहून हे चित्रीकरण पूर्ण केलं.
या पात्रासाठी तू काय-काय मेहनत घेतलीस?, या पात्राचा लहेजा, बारकाई तू कशी शिकलीस?,
संचिता आणि रिषिका यांच्यात तसं पाहायला गेलं तर खूप साम्य आहे. बॉसी, दबंग गर्ल टाईप वगैरे. त्यामुळे संचिता हे पात्र साकारताना मला तशी काही जास्त मेहनत करावी लागली नाही. आमच्या दिग्दर्शकांनी मला वेळोवेळी समजावून सांगितलं. हे असं केलं तर अजून मज्जा येईल असं ते मला सांगायचे, आणि त्यामुळेच संचिता हे पात्र खुलत गेलं. बँक मॅनेजर असल्याने त्या पात्राचा स्वभाव खूप जाणता आहे.
या पात्राने क्रिशिका म्हणून तुला काय दिल आहे?, आणि एक कलाकार म्हणून तुझ्यात किती बदल झाला आहे?
रिषिका कशी आहे तर मी घेतलेल्या गोष्टी कधीच जागच्या जागी ठेवत नाही, पण संचिता हे पात्र खूप टापटीप असल्याने त्या पात्राला वस्तू जागच्या जागी लागतात, तर खऱ्या आयुष्यात हा एक बदल झाला आहे. संचिताचे मूड खूप बदलतात, हे मूड सुरुवातीला मला नीट असे जमत नव्हते मात्र नंतर तेही जमत गेले. क्षणार्धात बदलणारे मूड सांभाळत काम करायला खूप मदत झाली.
सहकलाकारांबरोबरचा तुझा बॉण्ड कसा होता?, आणि शूटिंगदरम्यानचा एखादा किस्सा?
सहकलाकारांबाबत बोलायचं झालं तर ऑनस्क्रीन नाही तर ऑफस्क्रीनही आम्ही खूप धमाल केली आहे. आम्ही सहा जणांनी खूप धमाल केली. माझ्या घरून डबा यायचा, घरचं जेवण जेवणावरुन खूप भांडणही व्हायची. एकदा तर आम्ही छाया म्हणजेच आर्याला सोडून कासला गेलो होतो आणि संध्याकाळी आल्यावर तिला कळलं तेव्हा ती आमच्यावर फुगून बसली होती. तिला खूप राग आला होता. त्यांनतर तिची समजून काढणं आम्हाला खूप महागात पडलं. सेटवर तर आम्ही आमची खरं नावही विसरलो होतो. या आमच्या फोनमध्येही पात्रांच्या नावाने नंबर सेव्ह आहेत.
‘मैत्रीचा ७/१२’ वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर तुझ्या कुटुंबाकडून कसा प्रतिसाद मिळाला?, तुझा अभिनय, लूक पाहून सोशल मीडियावर तुला काय कमेंट येत आहेत?
‘मैत्रीचा ७/१२’ वेबसीरिज प्रदर्शित झाली तेव्हा माझी आई प्रचंड खुश झाली होती. स्क्रीनवर दिसणार हे माझं पहिलंच काम आहे त्यामुळे ती खूप खुश झाली होती. आणि घरातील सगळेच खूप खुश होते. माझी आईच माहेर हे बँगलोर आहे त्यामुळे तितकी नीटशी मराठी येत नाही. पण जेवढं कळतं तेवढं ते मला सांगतात. दिग्दर्शकाने तर आमच्यासाठी मैदान मोकळं केलं होतं, तुम्ही मज्जा करा मी तुम्हाला शूट करतो असं ते होतं. आणि आम्ही प्रत्येक सीन धमाल करत शूट केला. आणि बाहेरचे प्रेक्षक ही वेबसीरिज एन्जॉय करतायत हे पाहून आम्हाला तर आमच्या कामाची पोचपावती मिळाली आहे. प्रेक्षकांच्या कमेंट पाहून मी जे काम केलं आहे ते योग्य केलं आहे याची मला खात्री पटली आहे. कुटुंब, मित्र-परिवार शिवाय आता चाहत्यांचे, अनोळखी माणसांचेही काम सुंदर झालं आहे असे सांगणारे मॅसेज येत आहेत.
सेटवरच्या शेवटच्या दिवशी तुम्हा सगळ्यांच्या काय भावना होत्या?,
खरं सांगायचं तर आमचा सेटवरचा शेवटचा दिवस कसा रिऍक्ट करायचा हे आम्हाला कळलंच नाही. आमच्या सेटवरील अर्धी मंडळी ही दुसरीकडे होती. त्यामुळे आम्ही तितक्या जणांनी हा दिवस साजरा केला. आम्ही खूप इमोशनल झालो आहोत. त्या घराला निरोप देणं आम्हाला खूप कठीण झालं कारण आम्ही त्या घराशी खूप बांधले गेलो होतो. त्या घरात खूप रुळलो होतो. प्रत्येक सीन अगदी अंगावर येत होता. आणि शेवटच्या गणपती बाप्पा मोरयाला आम्ही पूर्णतः ढासळलो. पण आम्हा सहा जणांना हे माहित होतं की, हा आमच्या सीरिजचा शेवट नाही आहे. आम्ही अर्थात पुन्हा येणार आहोत आणि त्याच ताकदीने येणार आहोत.
‘मैत्रीचा ७/१२’ प्रेक्षकांनी का पाहावा?, आणि पुढील एपिसोडमध्ये कोणत्या गमतीजमती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत?
‘मैत्रीचा ७/१२’ ही वेबसीरिज पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की ही वेबसीरिज तुम्ही का पाहिली पाहिजे. प्रत्येकाच्या पात्रानुसार वेबसीरिजमध्ये रंगत येणार आहे. आणि ही रंगत वाढत जात वेबसीरिजचा आलेख हा वाढत जाणार आहे आणि हा आलेख वाढत जाण्यासाठी तुम्हा सगळ्यांना ही वेबसीरिज नक्की पाहावी. आम्ही सहा जणांनी सीरिजमध्ये खूप धमाल केली आहे आणि ही धमाल पाहून पोट धरुन हसायला तुमहाला ही वेबसीरिज नक्की पाहावी लागेल.