“हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे” असं म्हणत प्रेक्षकांना हसायला भाग पाडणारा अभिनेता व लेखक डॉ. निलेश साबळे याने ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. ‘चला हवा येऊ द्या’नंतर निलेश साबळे त्याचा नवाकोरा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘चला हवा येऊ द्या’नंतर संपूर्ण महाराष्ट्राला हसवायला कलर्स मराठी या वाहिनीवर ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’ हा नवीन घेऊन आला आहे. त्याच्या साथीला विनोदवीर भाऊ कदम ओंकार भोजने यांच्यासह स्नेहल शिदम, सुपर्णा श्याम आणि इतर काही कलाकारदेखील आहेत. नुकताच गेल्या आठवड्यात या शोचा पहिला भाग प्रदर्शित झाला.
यावेळी या भागात ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’ या शोचा खास सेटदेखील पाहायला मिळाला. इतर शोच्या सेटपेक्षा हा सेट खूपच हटके दिसत आहे. ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’ या शोचा सेट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या सेटवर रोजच्या जगण्यातल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सामान्य प्रेक्षकांसह प्रत्येकालाच हा सेट व सेटवरील अनेक गोष्टी भावत आहेत. अतिशय भव्यदिव्य असा हा सेट आहे. नक्की काय काय आहे या सेटवर. चला जाणून घेऊयात…
या सेटवर अलका कुबल यांच्या गाजलेल्या चित्रपटाच्या नावाने साडी सेंटर आहे. या सेटवर ‘माहेरची साडी सेंटर’ असं या दुकानाचं नाव आहे. तर पू.ल.देशपांडे यांच्या ‘बटाट्याची चाळ’ या पुस्तकाप्रमाणे या सेटवर ‘ब’तात्याची चाळ’देखील आहे. त्याचबरोबर या सेटवर एक बँकदेखील आहे, ज्या बँकेचं नाव ‘कर्ज फेड रे बँक’ असं आहे. तसेच एक हॉटेलही आहे ज्याचं नाव ‘हॉटेल आण्णा जेवायला… जेवायला…’ असं आहे, जे की भारत जाधव यांच्या संवादावरुन ठेवण्यात आले आहे.
आणखी वाचा – शुक्रवारच्या शिवयोगामुळे ‘या’ ५ राशींना होणार धनलाभ, तर ‘या’ राशींची होणार व्यवसायात भरभराट
तसेच या सेटवर एक कॉफी शॉपदेखील आहे, ज्याचं नाव ‘कॉफी बरी असता’ असं आहे. तसेच या दुकानात कॉफीचे अनेक प्रकारही आहे. यामध्ये ‘साधी कॉफी, महाग कॉफी आणि शहाणपण कॉफी’ असे प्रकार आहेत. त्याचबरोबर एक छोटेसे मेट्रो स्टेशनदेखील आहे. अतिशय रंगीबेरंगी व आकर्षक सजावट असलेलं हा सेट अनेक प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र होत आहे.
आणखी वाचा – अंकिता लोखंडे रुग्णालयामध्ये भरती, हाताला गंभीर दुखापत अन्…; बेडवरचा फोटो केला शेअर, म्हणाली, “आजारपण…”
दरम्यान ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोचं लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे यांनी केलं आहे. तर अभिनेते भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीरांबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम, रोहित चव्हाणसह अनेक कलाकार शोच्या टीममध्ये समाविष्ट आहेत. हा शो दर शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता कलर्स मराठी वहिनीवर प्रदर्शित होतो.