Munjya Box Office Collection : सध्या बॉक्स ऑफिसवर मुंज्या या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अल्पावधीतच या चित्रपटाने इतर चित्रपटांना मागे टाकत चांगलाच गल्ला जमवला आहे. सलग तिसऱ्या आठवड्यातही मुंज्या या चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केलं आहे. रविवारी या चित्रपटाने सात कोटी २० लाखांचा टप्पा पार केला. याबरोबर चित्रपटाची एकूण कमाई १०३ कोटींवर येऊन पोहोचली आहे. निव्वळ कलेक्शनच्या बाबतीत, चित्रपटाने आतापर्यंत ८७.३१ कोटींची कमाई केली आहे. रविवारी चित्रपटाची एकूण व्याप्ती ३३.०१% इतकी होती.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ‘मुंज्या’ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सहावा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ‘श्रीकांत’, ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ सारख्या मोठ्या स्टारकास्टसह प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपेक्षा अधिक कमाई केली आहे. सात जूनला प्रदर्शित झालेल्या ‘मुंज्या’ चित्रपटात अभिनेत्री शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह, सत्यराज यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे. याशिवाय या हिंदी चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे मराठी कलाकार झळकले आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी सांभाळली आहे.
कोकणातल्या मुंज्याची कथा प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे. कोकणात प्रचलित असलेल्या मुंज्याच्या दंतकथेच्या आधारावर हा चित्रपट आहे. या चित्रपटाने तिसऱ्या वीकेंडला १६ कोटी ३१ लाखांची कमाई केली आहे. चित्रपटाने शुक्रवारी ३.३१ कोटी, शनिवारी ५.८० कोटी आणि रविवारी ७.२० कोटींचा व्यवसाय केला. याआधी ‘मुंज्या’ने पहिल्या वीकेंडला ३६.५० कोटी आणि दुसऱ्या वीकेंडला ३४.५० कोटींची कमाई केली होती. अवघ्या १७ दिवसांत १०० कोटींची कमाई करुन या चित्रपटाने विक्रम केला आहे.
अल्पावधीतच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे. कलाकार मंडळींनीही हा चित्रपट पाहून स्तुती केलेली पाहायला मिळत आहे. शिवाय आशयघन आणि वेगळ्या जॉनरच्या चित्रपटाला पसंती देण्याचाही सल्ला दिला आहे. इतकंच नव्हे तर समीक्षकांनी देखील चित्रपटाची बाजू न्याहाळत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.