टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अभिनेत्रीच्या दुसऱ्या लग्नातही अडचणी असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. दरम्यान या दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्री नाखूष होऊन घटस्फोट घेणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. गेल्या वर्षी मार्च २०२३ मध्ये दलजीत कौरने केनियास्थित उद्योगपती निखिल पटेलसह दुसरे लग्न केले. निखिलशी दुसरे लग्न केल्यानंतर दलजीत कौर आपला मुलगा जेडेनबरोबर केनियाला शिफ्ट झाली. ‘इटाइम्स’च्या रिपोर्टनुसार, दलजीत व निखिल बराच काळ आनंदी नव्हते. (Dalljiet Kaur On Her Wedding)
समोर आलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, या जोडप्याला त्यांच्या लग्नानंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागला. लग्नानंतर ११ महिन्यांनी दलजीत केनियाहून भारतात परतली आहे. येथे आल्यानंतर तिने पती निखिलबरोबरचे सर्व फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन डिलीट केले होते. याबरोबर तिने पटेल हे आडनावही काढून टाकले. दरम्यान दलजीतचे दुसरे लग्नही टिकणार नसून लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या. यावरुन अभिनेत्रीचा निखिल पटेलबरोबर घटस्फोट होऊ शकतो, अशा चर्चांना उधाण आलं.
दलजीत व निखिल यांच्या घटस्फोटाची अफवा पसरल्यानंतर अभिनेत्रीच्या टीमने अभिनेत्रीच्यावतीने अधिकृत निवेदन जारी केले होते. ‘इटाइम्स’च्या वृत्तानुसार, टीमने सांगितले की दलजीत आणि तिचा मुलगा जेडेन अभिनेत्रीच्या वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी भारतात आले आहेत. तिच्या आईचीही प्रकृती ठीक नाही आणि तिच्यावरही शस्त्रक्रिया होणार आहे. दलजीत कौरचे पहिले लग्न २००९ मध्ये टीव्ही अभिनेता शालीन भानोतसह झाले होते. अभिनेत्रीला तिच्या पहिल्या लग्नात घरगुती अत्याचाराला सामोरे जावे लागल्याचं समोर आलं होत.
शालिन भानोतबरोबरच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या आयुष्यात संकटं आली असल्याचं दलजीत कौरने म्हटलं होतं. कारण लग्नात तिला मिळालेल्या भेटवस्तूंवर तिचे सासरचे लोक नाराज होते. दलजीतने शालिन भानोतवर घरगुती हिंसाचाराचा आरोपही केला होता आणि २०१५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दलजीत व शालिन भानोत यांचा मुलगा जेडेन हा सध्या त्याच्या आईबरोबर राहत आहे.