अभिनेता सैफ अली खान सध्या खूप चर्चेत आहे. गुरुवारी त्याच्यावर राहत्या घरात हल्लेखोराने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सैफ जबर जखमी झाला. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून तो आता सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या सगळ्या प्रकारानंतर सैफच्या हल्लेखोरांचा तपास मुंबई पोलिसांनी सुरु केला. काही दिवसांपूर्वी एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी वांद्रे परिसरातून ताब्यात घेतले होते. त्याची चौकशीदेखील करण्यात आली. अशातच आता आज म्हणजे १९ जानेवारी रोजी सकाळी एक आरोपी पकडला गेलं आहे. त्याला मुंबईतील ठाणे या भागातून ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने त्याचा गुन्हा कबूल केल्याचेही समोर आले आहे. (saif ali khan attack update)
मुंबईतील ठाण्यात हा आरोपी कामगारांबरोबर लपून बसला होता. मुंबई पोलिसांकडून हा तपास सुरु होता. दरम्यान त्याला जेव्हा पकडण्यात आले तेव्हा त्याने स्वतःचे नाव विजय दास सांगितले. मात्र पोलिसांनी कसून चौकशी करताच त्याने स्वतःचे नाव मोहम्मद आलियन असल्याचे सांगितले. पोलिसांनी याबद्दल माहिती दिली आहे. पोलिसांच्या मते, या आरोपीने स्वतःची अनेक नावं ठेवली आहेत. चोरी करण्याच्या हिशोबाने हल्लेखोर घरात घुसला होता. त्याच्याकडे सध्या कोणतीही कागदपत्र सापडली नाहीत. मात्र तो बांगलादेशी असण्याची शक्यता आहे. त्याच्याकडे कोणतेही भारतीय रहिवासी असल्याची कागदपत्रं नाहीत.
तसेच हा आरोपी अवैधरित्या भारतात घुसला असल्याचीही शक्यता असल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्याने स्वतःचे नाव विजय दास असे ठेवले होते. पाच ते सहा महिन्यांपूर्वी तो मुंबइमध्ये आला. काही दिवस मुंबई व आजूबाजूच्या परिसरात तो राहिला. तो एका हाऊसकीपिंगच्या एजन्सीमध्ये काम करत होता. त्याची आता पुढील चौकशी सुरु असल्याचे डिसीपी दीक्षित गेडम यांनी सांगितले.
दरम्यान सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत मुंबई पोलीस अत्यंत सतर्क असून पूर्ण सतर्कतेने तपास करत आहेत. अलीकडेच एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयिताची झलक दिसली, ज्यामध्ये तो पिवळा शर्ट घातलेला दिसत होता. यामध्ये संशयित वर्सोवा येथील एका घरातील शूज रॅकमधून शूज आणि चप्पल चोरताना दिसत होता.