Bigg Boss Marathi 5 : ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत तिने अंतरा हे पात्र साकारलं होतं. गेल्यावर्षी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तरीही अंतरा-मल्हारची जोडी प्रेक्षकांच्या मनात कायम होती. मालिका संपल्यावर या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. लग्नानंतर पाच महिन्यांनी योगिताने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला. अभिनेत्रीकडून सर्वांनाच प्रचंड अपेक्षा आहेत. पण, पहिल्या दिवसापासून योगिता फारसा चांगला खेळ नसल्याची बाब प्रत्येकाच्या लक्षात आली. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या भाऊचा धक्कामध्ये रितेशने योगिता चव्हाणचं कौतुक करताच अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले. यावेळी भावुक होत तिने मनातली एक इच्छा बोलून दाखवली. यामुळे सर्वांनाच धक्का बसल्याचं पाहायला मिळालं.
अंकिताला कॅप्टन बनवण्यात योगिताचा मोठा वाटा आहे. त्यामुळे रितेशने यावेळी “योगिता तुम्ही खूप उत्तम खेळत आहात” अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर योगिता रडू लागली. योगिताला रितेशसमोर अश्रू अनावर झाले, तिने कसलाही विचार न करता “मी संपूर्ण टीमची माफी मागते. मला माहित आहे की हे योग्य नाही. मला सगळे सांगतात तू इथे कशाला आलीस. माझंही चुकलं हे मी मान्य करते” असं म्हटलं. अशातच तिचा पती सौरभ चौघुलेने याबद्दल भाष्य केलं आहे. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत सौरभने तिच्या खेळण्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे? याबद्दल भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – पुन्हा एकदा ‘साडे माडे तीन’, तब्बल १७ वर्षांनी सिक्वेलची घोषणा, ‘हा’ मुख्य अभिनेता करणार दिग्दर्शन
‘बिग बॉस’च्या घरात योगिताला खेळताना पाहून घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे? याबद्दल सौरभने असं म्हटलं आहे की, “योगिताला रडताना पहिल्यानंतर माझी प्रामाणिक प्रतिक्रिया ही होती की, तिने आता बाहेर यावं. कारण मी योगितापेक्षा दहा पट अधिक भावुक आहे. यावर माझ्या आईने मला असं म्हटलं की, तू काय वेडा आहेस का? तिने असं न खेळताच बाहेर आलेलं तुला चालणार आहे का? पण माझं असं होतं की, मला माहीत आहे की, हे लोक कसे आहेत? मी या लोकांबरोबर राहिलो आहे. ही इंडस्ट्री कशी आहे? हा खेळ कसा आहे? हेही मला माहीत आहे. त्यामुळे मी आईला म्हटलं की तिला मानसिकदृष्ट्या तिथे खूप त्रास होईल. पण माझी आई असं म्हणाली की, ती आता खेळलीच पाहिजे”.
आणखी वाचा – योगिताला घराबाहेर पडण्याची इच्छा, पण नवरा सौरभ Bigg Boss Marathi च्या घरात येणार का?, म्हणाला, “मी आता…”
यापुढे तो असं म्हणाला की, “बिग बॉस’च्या घरात योगिताला खेळताना पाहून एपिसोड संपल्यानंतर माझी आई एकटीच गालातल्या गालात हसत होती. तेव्हा मी तिला विचारलं की, काय झालं? तेव्हा ती म्हणाली की, “माझी सूनबाई खेळली. माझी मुलगी खेळली”. त्यामुळे मला असं वाटलं की, मी चुकीचा होतो. योगिता तिथे तिचा संघर्ष करत आहे. मी फक्त तिच्यावर प्रेम करतो म्हणून मला तिची काळजी आहे. पण तिला खेळलं पाहिजे. ती कुठे चुकली तर महाराष्ट्राची जनता तिला घराबाहेर काढेलच. त्यामुळे मी तिला थांबवणारा कुणीही नाही. मी तिच्यावर प्रेम करतो. मला तिची काळजी आहे. त्यामुळे तिने बाहेर यावं असं मला वाटलं. पण आता तिला खेळताना पाहून मलादेखील आनंद होत आहे”.