Bigg Boss Marathi Season 5 Opening Ceremony Updates : गेल्या अनेक दिवसांपासून अनेक चाहत्यांना ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वाची उत्सुकता लागून राहिली होती. ‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि हीच उत्सुकता आता पूर्ण होणार आहे. कारण ‘बिग बॉस’ मराठीचे पाचवे नवीन पर्व आता सुरु होत आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज पार पडणाऱ्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा होणार आहे. यावर्षी स्पर्धकांसाठी ‘बिग बॉस’चं संपूर्ण घर काचेच्या महालासारखं सजवण्यात आलं आहे.
‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाचे आतापर्यंत तीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यापैकी पहिल्या प्रोमोमधून घरातील स्पर्धक हा गायक असल्याचे समोर आले. या प्रोमोमुळे अनेकांनी हा स्पर्धक ‘इंडियन आयडॉल’ फेम अभिजीत सावंत असल्याची चर्चा होती. तर दुसऱ्या पर्वामधून ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्यांदाच एका ‘परदेसी गर्ल’ची धमाकेदार एन्ट्री होणार असल्याचं पाहायला मिळालं. अशातच तिसरा प्रोमोही प्रदर्शित झाला. यामधून देसी बॉईजची खास झलक पाहायला मिळाली.
‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांबद्दल अनेक चर्चा होताना पाहायला मिळाल्या. यापैकी सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर अंकिता वालावलकर, अभिनेता शुभंकर तावडे, वर्षा उसगांवकर, चेतन वडनेरे अशा अनेक नावांच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता घरातील ही स्पर्धक नक्की कोण आहेत हे आता ग्रँड प्रीमियरमध्ये पाहायला मिळणार आहे. यंदाची ‘बिग बॉस’च्या घराची थीम ही चक्रव्यूह असलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या चक्रव्यूहमध्ये कोण कोण अडकणार? हे पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, नुकतीच ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली असून हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीसह जिओ सिनेमावरही पाहता येणार आहे. रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघता येणार आहे. २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.