Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला आता जवळपास सात आठवडे पूर्ण झाले आहेत. यंदा या घरात एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी पुरुषोत्तमदादा पाटील, निखिल दामले, योगिता चव्हाण, इरिना आणि घन:श्याम दरवडे या स्पर्धकांनी आतापर्यंत या घराचा निरोप घेतला आहे. त्यामुळे आता उर्वरीत सदस्यांमध्ये या घरात टिकून राहण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या लढतीसाठी ‘बिग बॉस’कडून अनेक नवनवीन टास्क स्पर्धकांना देण्यात येतात आणि याच टास्कमधून स्पर्धकांची या खेळात टिकून राहण्याची क्षमता दिसून येते. दर आठवड्यात पहिल्या दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडतो. साधारणत: सोमवार-मंगळवारीच या आठवड्यात नेमकं कोणं नॉमिनेट होणार? हे प्रेक्षकांसमोर स्पष्ट होतं. (Bigg Boss Marathi 5 Elimination)
‘बिग बॉस मराठी’च्या सातव्या आठवड्यात या घरातील एकूण सहा स्पर्धक नॉमिनेट झाले होते. या घरात ‘जादुई दिवा’ हा नॉमिनेशन टास्क घेण्यात आला होता आणि यात निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर आणि आर्या जाधव हे सहा सदस्य नॉमिनेट झाले. या सहा सदस्यांपैकी आर्या जाधव घराबाहेर पडली आहे. ‘बिग बॉस’चा निर्णय मोडल्यामुळे तिला या घरातून बाहेर जावे लागले. भाऊचा धक्कामध्ये रितेशने सांगितले होते की आर्या ही नॉमिनेटेड सदस्यांपैकीच एक होती. ती घराबाहेर गेली असली तरीही एलिमिनेशन हे होणारचं आणि या एलिमिनेशनमध्ये वैभव चव्हाण हा स्पर्धक घराबाहेर पडला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात वैभवचा प्रवास हा खूपच रंजक होता. वैभवने आतापर्यंत चांगला गेम खेळत व चांगले टास्क खेळत इथपर्यंतचा प्रवास केला मात्र त्याचा हा प्रवास आता संपला आहे. आजचा भाऊचा धक्का खूपच खास होता. आजच्या भाऊचा धक्कामध्ये सगळे स्पर्धक आपल्या घरच्यांच्या आठवणीत भावुक झाले. रितेशने स्पर्धकांबरोबर मजामस्तीही केली. पण अखेर वैभवच्या ‘बिग बॉस’च्या घरातील एक्झिटनंतर घरातील वातावरण भावनिक झाले. वैभव बाहेर जाताना अरबाज व अंकितासह सर्वांनाच अश्रू अनावर झाले.
दरम्यान, वैभवचा प्रवास हा प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे संपला असला तरी शनिवारच्या भाऊचा धक्कामध्ये आर्याने या घरचा निरोप घेतला. टास्कमध्ये झालेल्या वादात आर्याने थेट निक्कीच्या कानशिलात लागवल्यामुळे आर्याला ‘बिग बॉस’ने घरातून तत्काळ बाहेर निघून जाण्याची शिक्षा दिली. अगदी कुणालाही निरोप देण्याची संधी न देताच आर्याला या घराच्या बाहेर काढण्यात आलं. यामुळे आता प्रेक्षक मंडळी प्रचंड संतापली आहेत.