April May 99 : उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टाल्जिक सफर घडवणारा ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाच्या टीझर व गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतानाच या चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेवर पुनर्विचार करण्यात आला असल्याचं समोर आलं आहे. मात्र आता प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक न ताणता अखेर हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ‘मापुस्कर ब्रदर्स’ इन असोसिएशन विथ ‘फिंगरप्रिंट फिल्म्स’, ‘नेक्सस अलायन्स’, ‘थिंक टँक’ आणि ‘मॅगिज पिक्चर्स’ प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले आहे.
आजच्या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या युगात सुट्ट्यांचा आनंद फक्त स्क्रीनपुरता मर्यादित राहिला आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा ना स्मार्टफोन्स होते, ना वायफाय आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचा खरा आनंद मिळायचा गावाला जाऊन मोकळ्या हवेत फिरण्यात, नदी-समुद्रावर फेरफटका मारण्यात, सायकलवर भटकंती करण्यात, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपण्यात आणि बर्फाचे गोळे खात मजा लुटण्यात! अशीच ‘त्या’ वेळची उन्हाळ्यातील सुट्ट्यांची सफर हा चित्रपट घडवणार आहे. चित्रपटात कृष्णा, सिद्धेश, प्रसाद व जाई यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची कहाणी पाहायला मिळणार आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच आपल्या सुट्ट्यांची आठवण करुन देतील.
आणखी वाचा – “सासूबाईंमुळे एकत्र राहतो नाहीतर…”, गोविंदाच्या बायकोचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “कोणाची नजर लागली आणि…”
राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, योगेश भूटानी आणि मॉरिस नून ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते लॉरेन्स डिसोझा आहेत. या चित्रपटात आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर, साजिरी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १६ मे रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता काही कारणास्तव थोडासा उशिराने रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या २३ मे रोजी हा सिनेमा सिनेमागृहात साऱ्यांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास सज्ज होत आहे.
आणखी वाचा – तीन वर्षांची असताना अॅसिड हल्ला, दृष्टी गेली अन् ‘ति’ने १२वीमध्ये मिळवले ९५ टक्के
बालपणातील आठवणी जागवणाऱ्या या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली असतानाच या चित्रपटातील एक गोड, हृदयस्पर्शी गाणे प्रदर्शित झाले. या गाण्याने चित्रपटाची उत्सुकता अधिक वाढवली आहे. गाण्याने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा शालेय दिवसांची आणि पहिल्या मैत्रीणीची आठवण जागी केली आहे. ‘मन जाई’ असे बोल असणाऱ्या या गाण्याला सोनू निगम यांचा सुरेल आवाज लाभला असून प्रशांत मडपुवार, रोहन प्रधान यांनी हे गाणं शब्दबद्ध केले आहे. तर रोहन -रोहन यांच्या संगीताने हे गाणे अधिकच श्रवणीय बनले आहे.