सध्या मनोरंजन विश्वात अंबानी कुटुंबाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. लग्नापुर्वीच्या विधींनाही सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. नुकताच राधिका व अनंत यांचा संगीत सोहळा व हळदी समारंभ अगदी थाटामाटात पार पडला. अंबानी कुटुंबाची चर्चा सुरु असताना चित्रपट निर्मात्याच्या लेकीने केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. (Anant Ambani And Radhika Merchant Wedding)
चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप हिने नुकतेच अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याबद्दल आपले मत व्यक्त केले आणि तिने याचे वर्णन ‘सर्कस’ असे केले आहे. याचबरोबर आलियाने तिला निमंत्रित करण्यात आल्याचा खुलासाही केला. मात्र, तिने या समारंभाला उपस्थित राहण्यास नकार दिला. आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवरील ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये असे म्हटलं आहे की, “यावेळी अंबानींचे लग्न नसून सर्कस बनले आहे”. तिने हे देखील कबूल केले की, या लग्नाचे व्हायरल व्हिडीओ पाहण्याचा ती आनंद घेत आहे आणि श्रीमंत लोकांच्या आयुष्याने तिला आकर्षित केले आहे, परंतु पार्टीचे आमंत्रण तिने नाकारले असल्याचं सांगितलं आहे.

तिने लिहिले, “मला काही कार्यक्रमांसाठी आमंत्रित करण्यात आले होते कारण ते PR करत होते पण मी नकार दिला कारण मला विश्वास ठेवायचा होता की, एखाद्याच्या लग्नासाठी स्वत: ला विकणे हे कधीही वाईट. हा माझा आत्मसन्मान मला अधिक महत्त्वाचा वाटला”. अनंत व राधिकाच्या कॉन्सर्टमध्ये जस्टिन बीबरच्या परफॉर्मन्सचाही समाचार घेतला आणि लिहिलं की, “आमच्याकडे जास्तीचे पैसे आहेत, त्याचे काय करायचे? अरे, जस्टिन बीबरला कॉल करुया”.
जस्टिन बीबरने कॉन्सर्टमध्ये त्याच्या परफॉर्मन्ससाठी तब्बल ८४ कोटी रुपये शुल्क आकारले होते आणि त्याने त्याची काही लोकप्रिय चार्टबस्टर गाणीदेखील यावेळी गायली होती. सलमान खान, रणवीर सिंग, अनन्या पांडे, सारा अली खान, जान्हवी कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, बादशाह, करण औजला व इतर कलाकारही कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना दिसले. अनंत व राधिका १२ जुलै रोजी मुंबईत पारंपरिक पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत. यानंतर १३ जुलैला आशीर्वाद सोहळा आणि १४ जुलैला भव्य रिसेप्शन पार्टी होईल.