Usha Nadkarni Struggle Period : स्ट्रगल हा कोणाला चुकलेला नाही. सर्वसामान्यांपासून ते अगदी श्रीमंतार्यंत प्रत्येकजण या अनेक समस्यांचा सामना करतच यशाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरु ठेवतो. अनेक अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. बरेचदा घरातून पाठिंबा नसतानाही या कलाकार मंडळींनी स्वमेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं आणि यापैकीच एक अभिनेत्री म्हणजेच उषा नाडकर्णी. नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये स्वतःच असं वेगळं स्थान निर्माण करण्यात उषा नाडकर्णी या कुठेच मागे पडल्या नाहीत. मराठीसह हिंदीतही उषा नाडकर्णी यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवली. काही दिवसांपूर्वीच त्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कुकिंग शोमध्ये दिसल्या होत्या. नुकतीच उषा नाडकर्णी यांनी भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टवर उपस्थित राहत मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला दिसला.
उषा नाडकर्णी मराठी नाटकांमध्ये काम केलेल्या त्या दिवसांची आठवण काढत म्हणाल्या, “२ मार्च १९६५ ला मी बीएमसीत कामाला लागली. २४ जानेवारी १९७५ ला बीएमसीतलं काम सोडलं. नऊ वर्षे १० महिने मी बीएमसीत काम केलं. त्यानंतर ३० जानेवारी १९७५ मध्ये देना बँकमध्ये कामाला लागली आणि २ फेब्रुवारी २००१ मध्ये ते काम सोडलं, ज्याला २५ वर्षे झाली आहेत. तेव्हा अभिनय क्षेत्रातही काम करत होते. जर मला दुपारी प्रयोगासाठी जायचं असेल तर मी डबा घेऊन जात नव्हती. कारण डबा खाण्यात माझी १५ मिनिटं जाणार म्हणून. मराठी नाटकाचे प्रयोग सकाळी, दुपार, रात्री असायचे त्यामुळे बरीच तारांबळ उडायची”.
आणखी वाचा – लग्नाच्या चार वर्षानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, राजेशाही थाटात लेकीचं बारसं, नाव ठेवलं…
लहानपणी ओढवलेल्या वाईट काळाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “मला लहानपणापासून नृत्य, अभिनयाची आवड आहे. पप्पांना माझ्या अभिनयाबाबत काहीच प्रॉब्लेम नव्हता पण, आईला मी जे काही करत आहे ते अजिबात आवडत नव्हतं. ती शिक्षिका होती आणि ती एक आई म्हणून बरोबर होती. मुलीचं लग्न होणार आहे, लोक काहीही बोलतात आणि नाटक क्षेत्रात काम करायचं झालं तर वेळा ठरलेल्या नसतात. कधीही येतात आणि कधीही जातात. एकेदिवशी माझ्या आईने माझे सगळे कपडे घराबाहेर फेकले आणि म्हणाली, ‘नाटक करायचं असेल तर आमच्या घरातून निघून जा’. मी पण खूप रागीट होते. मी सगळे कपडे उचलले. आम्ही ग्रँड रोडला राहत होतो. तर मी पूर्वेला गेले, बॅग खरेदी केली. मग बाहेर फेकलेले कपडे भरले आणि माझी मैत्रीण होती, जी माझ्याबरोबर बीएमसीत काम करत होती, तिच्या घरी गेले. दुसरीकडे पप्पा ऑफिसमध्ये मला शोधायला आले होते”.
आणखी वाचा – स्वप्न पडतात पण झोपेतून उठल्यानंतर त्याचा विसर का पडतो?, यामागे नेमकं कारण काय?, वैज्ञानिक कारणांनुसार…
या किस्स्यानंतर हर्षने त्यांना “तेव्हा तुम्ही किती वर्षांच्या होता?”, असा प्रश्न विचारला. त्यावर उषा नाडकर्णी म्हणाल्या की, माझं तेव्हा लग्नही झालं नव्हतं. १८-१९ वर्षांची असेल. मी सात दिवसांनंतर घरी परतले. तेव्हा पप्पा ज्योतिषांकडे गेले आणि त्यांनीही सांगितलं होतं, ती आठवड्याभरात घरी परत येईल. त्यावेळेस माझे भाऊ-बहीण मी घरी परत येण्यासाठी सतत ऑफिसमध्ये येत असायचे. पण मी म्हणायचे, तुम्ही जा. आईला मी नकोय ना. तर तुम्ही जा. मात्र जेव्हा मला पारितोषिक मिळायची तेव्हा आमचं सगळं कुटुंब एकत्र असायचं. त्यावेळीच त्यांना कळायचं, ही काम करतेय. काही लफडी वगैरे नाही आहेत. त्यामुळे माझ्याबाबतीत सकारात्मक झाले आणि मग त्यांनी राग सोडून दिला”.