दीपिका पदुकोण लवकरच आई होणार असून तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. बेबी बंपवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना अखेर दीपिकाने गप्पही केले आहे. दीपिका व तिचा पती रणवीर सिंग त्यांच्या पहिल्या बाळाकडे डोळे लावून बसले आहेत. अशातच अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. अस्पष्ट चित्रात दीपिकाचा चेहरा दिसत नव्हता पण ती काळ्या रंगाच्या बॉडी-हगिंग आउटफिटमध्ये पोज देताना दिसली. (Deepika Padukone Troll)
हे फोटो पोस्ट केल्यानंतर अभिनेत्री संध्याकाळी ‘कल्की 2898 एडी’च्या कार्यक्रमात हजेरी लावताना दिसली. जिथे तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत होता. या कार्यक्रमात दीपिका उंच टाचांच्या चपला घालून आली होती. अभिनेत्री या उंच टाचांच्या चपलेमुळे बरीच चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण मतदानासाठी बाहेर पडली तेव्हाही तिला ट्रोल केले गेले आणि नेटकऱ्यांनी तिच्या बेबी बंपला फेक असे म्हटले.
अभिनेत्री ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या कार्यक्रमात पोहोचली तेव्हा स्टेजवर येताना अभिनेत्रीला अमिताभ बच्चन यांनी हात दिला आणि त्यानंतर प्रभासने तिला खुर्चीत बसण्यासाठी आग्रह केला. या कार्यक्रमात अभिनेत्रीने उच्च टाचांसह काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. अभिनेत्रीच्या या लूकवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दीपिका ६ महिन्यांची गरोदर आहे आणि अशातच उंच टाचांच्या चपला घातल्याने अभिनेत्रीवर टीका करण्यात आली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, “गरोदरपणात अशा उंच टाचांच्या चपला धोकादायक असतात”. तर आणखी एकाने सांगितले, “तुम्हाला कितीही सुंदर दिसायचे असले तरी या वयात उंच टाचांच्या चपला घालू नका”. एकाने लिहिले आहे की, “गरोदरपणात एवढी उंच टाच कोण घालतं?”, असं म्हणत प्रत्येकाने गरोदरपणात उंच चपला घातल्याने तिला ट्रोल केलं आहे.
या कार्यक्रमादरम्यान, दीपिकाने तिच्या बेबी बंपबद्दल आणि प्रभासबद्दल तसेच सेटवरील संपूर्ण स्टाफ तिची कशी काळजी घ्यायचा याबाबत भाष्य केलं आहे. दीपिका म्हणाली, “त्याने मला खाऊ घातलेल्या अन्नामुळे मी अशी आहे. एका वेळी, असे वाटले की जणू काही हे जेवण त्याच्या घरातून येत नाही, तर ते सेवा केंद्रातून येत आहे. प्रभास इतकं सगळ्यांना खायला घालतो. जे त्याला ओळखतात त्यांना माहीत आहे की तो मनापासून सगळ्यांना जेवू घालतो”.