कलाकार म्हटलं की त्यांचे अनेक चाहते आले आणि हे चाहते आले म्हटलं की त्यांच्यांशी संबंधित नानाविध किस्सेही आले. कलाकारांना त्यांच्या आयुष्यात अनेक चाहते भेटत असतात, जे त्यांच्या कामाला प्रतिसाद देत असतात. याच चाहत्यांच्या अनेक किस्स्यांची शिदोरी कलाकारांकडे असते. मात्र, काही चाहत्यांचे अनुभव हे एखाद्या कलाकारासाठी कोणत्याही पुरस्कारापेकक्षा कमी नसतात. चाहत्यांचे हे किस्से कलाकारांना खऱ्या अर्थाने समृद्ध करतात. असाच काहीसा समृद्ध करणारा अनुभव प्रसाद ओकच्याही वाट्याला आला होता. याबद्दल त्याने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. अभिनेता व दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता सध्या ‘धर्मवीर-२’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
‘धर्मवीर-२’ निमित्ताने प्रसाद ओक सध्या मुलाखती देत आहे. अशातच त्याने नुकतीच ‘आरपार’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रसादने त्याच्या एका चाहत्याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. प्रसादने मध्यंतरी ‘भांडा सौख्य भरे’ या नावाचा एक कार्यक्रम केला होता. तेव्हाचा हा किस्सा आहे. हा किस्सा सांगताना त्याने असं म्हटलं की, “एका घरात मी शूटिंग केल्यानंतर मी दुसऱ्या ठिकाणी शूटिंगसाठी निघणार होतो. तेव्हा त्या घरातील सूनेने मला त्यांच्या एका लांबच्या आजींना मला भेटायचे आहे असं सांगितलं. तर त्यांनी मला अर्धा तास थांबण्याची विनंती केली. तेव्हा मी विक्रोळीला शूटिंग करत होतो आणि मला पुढील शूटिंगसाठी विरारला जायचं होतं”.
पुढे प्रसादने असं म्हटलं की, “मला घाई असल्याचे मी त्यांना सांगितलं. पण त्या आजी खूप म्हाताऱ्या होत्या आणि त्यांचं वय जवळपपास ८० ते ८५ वर्ष होतं. त्यामुळे मी थांबलो. मग त्या आजी आल्या आणि त्यांनी मला चांदीची नोट भेट म्हणून दिली. जी माझ्याकडे आजही आहे. ती भेट देताना त्यांनी मला असं म्हटलं की, “बाळा तू जो सारेगमप हा गाण्याचा कार्यक्रम जिंकला होतास तेव्हा मी हे पान तुझ्यासाठी भेट म्हणून घेतलं होतं. मला खात्री होती की, मला तू आयुष्यात कधीतरी भेटशील आणि मी हे पान तुला नक्की देईन”.
आणखी वाचा – Video : अधिपती-अक्षरामध्ये खुललं प्रेम, परदेशात हनिमून करत आहेत एन्जॉय, रोमँटिक व्हिडीओ समोर
पुढे प्रसादने असं म्हटलं की, “या सगळ्यामुळे माझा चेहरा फाटेल की काय इतकं आश्चर्य माझ्या चेहऱ्यावर होतं आणि यावर माझा विश्वासही बसत नव्हता. हेच त्या आजींनी ओळखलं आणि त्यांनी माझा विश्वास बसावा म्हणून त्यांच्याकडची पावतीही दाखवली. त्या पावतीवर २४ जून २००७ ही तारीख होती आणि २३ जूनला मी ‘सारेगामप’ शो जिंकला होता”. यापुढे प्रसादने अशा खास क्षणांसाठी ‘भांडा सौख्य भरे’ या शोचे आभार मानले. त्या शोमुळे माझ्या वाट्याला असे प्रसंग आल्याचे त्याने सांगितले.