Mandar Jadhav Bts Video : कलाकार मंडळींचा सिनेसृष्टीतील प्रवास थक्क करणारा असतो. ही कलाकार मंडळी नेहमीच त्यांच्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत आपला जम बसवू पाहतात. कलाकार मंडळींच्या मेहनतीचं बरेचदा प्रेक्षकांकडून भरभरुन कौतुकही केलं जातं. ही कलाकार मंडळी आणि प्रेक्षक यांचं एक निराळंच समीकरण आहे. सिनेसृष्टीत वावरत असताना प्रेक्षकांच्या प्रेमापोटी कलाकार मंडळी कुठलीही सीमा न बाळगता अभिनयाची जादू दाखवतात. अथक मेहनत करत त्यांच्या कलाकृती ते पेश करतात. विशेषतः मालिकाविश्वातील कलाकारांना हा स्ट्रगल अधिक आहे. हो कारण घर, कुटुंब, वैयक्तिक आयुष्य सांभाळत न चुकता ही मंडळी त्यांच्या शिफ्टनुसार चित्रीकरणाला पोहोचतात.
मालिकाविश्वात तर चित्रीकरण करताना या कलाकारांना भूक, तहान, दिवस-रात्र याचाही विसर पडतो. हो. केवळ आपल्या प्रेक्षकांना अभिनयाने खुश करावे, त्यांचे मनोरंजन व्हावे ही एकमेव त्यामागची धडपड असते. प्रेक्षकांच्या दोन मिनिटांच्या आनंदासाठी कित्येकदा ही कलाकार मंडळी स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाहीत. “प्रेक्षकांच्या दोन मिनिटांच्या आनंदासाठी एक कलाकार स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही मागे पुढे पाहत नाही”, असं कॅप्शन देत एका मराठमोळ्या अभिनेत्याने सीन शूट करतानाचा व्हिडीओ शेअर करत साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेता मंदार जाधवच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये मंदार भूमिकेत दिसत असून तो समोरून येणाऱ्या कारला धडकताना दिसत आहे. यावेळी ती कार येऊन आपल्याला धडकली तर दुखापत होईल याची भीतीही त्याच्या चेहऱ्यावर दिसली नाही, यावरुन हा कठीण सीनही मंदार अगदी मन लावून करताना दिसला. खरंतर हा व्हिडीओ मंदारच्या फॅनपेजवरुन शेअर केला असून मंदारनेही हा व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
आणखी वाचा – धक्कादायक! सात वर्षांनी आयुष्मान खुरानाच्या बायकोला पुन्हा एकदा कॅन्सर, हसत म्हणाली, “हा दुसरा राऊंड…”
या व्हिडीओखाली मंदारने कमेंट करत, “मनोरंजनासाठी काही पण”, असं म्हटलं. सध्या मंदार ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू?’, या मालिकेमध्ये झळकणार आहे. या मालिकेत मंदारसह गिरीजा प्रभू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी मंदार आणि गिरीजा यांनी ‘सुख म्हणजे नक्की काय असत’, या मालिकेत एकत्र काम केलं होतं. आता पुन्हा ही जोडी एकत्र झळकणार असून दोघांना पुन्हा छोट्या पडद्यावर एकत्र पाहणं रंजक ठरणार आहे.