Bigg Boss Marathi 5 : कलाक्षेत्रात घडत असलेल्या प्रत्येक घडामोडींवर व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. काही कलाकार तर आपलं मत अगदी खुलेपणाने मांडताना दिसतात. आताही असंच काहीसं चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’चं नवं सीझन सध्या चांगलंच गाजत आहे. या शोमध्ये होणारे वाद-विवाद याबाबत काही कलाकार आपलं मत मांडत आहेत. निक्की-जान्हवीच्या काही वादग्रस्त विधानांबाबत निषेध व्यक्त करत आहेत. पण बऱ्याचदा कलाकरांना आपलं मत मांडत असताना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. ट्रोलर्स अगदी शिवीगाळ करण्यापर्यंत पातळी गाठतात. असंच काहीसं आता अभिनेत्री गायत्री दातारबाबत घडलं आहे. (Gayatri Datar abused by netizen)
Endemolshineind ने ‘बिग बॉस मराठी’च्या आधीच्या सीझनचे स्पर्धक जय दुधाणे व उत्कर्ष शिंदेसह गायत्रीची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य आणि त्यांची वागणूक याबाबत भाष्य केलं. यावेळी गायत्रीला या सीझनमधील “तिचा आवडता स्पर्धक कोण आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी गायत्री असं म्हणाली की, “अभिजीत सावंत माझा आवडता स्पर्धक आहे. कारण तो ज्या हुशारीने खेळत आहे, तसा अजून घरात कुणी खेळत नाहीये”. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
या व्हिडीओखाली एकाने आईवरुन शिवी दिली असून यात त्या नेटकऱ्याने “तू डबल ढोलकी आहेस. परवा सूरजची सर्वात मोठी फॅन आहेस असं म्हणाली आणि आता अभिजीत आवडतो असं म्हणत आहेस”. या नेटकऱ्याने शिवीचा वापर केल्याबद्दल गायत्रीने नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं आहे. गायत्रीने नेटकऱ्याच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत त्यावर “तुझ्या आईशी पण असंच बोलतोस का रे? हिंमत असेल तर खऱ्या आयडीवरुन येऊन बोलून दाखव”.

दरम्यान, गायत्री सध्या कलर्स मराठीवरीलच अबीर गुलाल या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेची टीम गेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या घरात हजेरी लावली होती. यावेळी तिच्याबरोबर अक्षय केळकरदेखील होता. यावेळी गायत्रीने सूरज हा तिचा आवडता स्पर्धक असून ती त्याची फॅन असल्याचे तिने म्हटलं होतं. यावरून नेटकऱ्याने ही कमेंट केली आहे.