Swiggy Delivery Boy Viral Video : मोठ्या पगाराची नोकरीच हवी असं म्हणत कित्येक लोक आजही घरात केवळ बसून आहेत. आपलं पुढं कसं होईल, या महागाईच्या दुनियेत नुसतं घरात बसून राहणं कितपत योग्य आहे हा विचारही त्यांच्या मनात येत नसावा का?. कोणताही जॉब करुन वेळ मारून न्यावी असा विचार करण्याऐवजी ही मंडळी घरात कशी बसू शकतात हा प्रश्नच पडतो. तर याउलट काही अशी लोक असतात जी त्यांच्या मानविरोधात जाऊन घरची परिस्थिती लक्षात घेता पडेल ते काम करतात. यावेळी किती पगार असेल, जॉब कुठे असेल, काय काम असेल हे असले प्रश्न त्यांच्या आजूबाजूलाही येत नाहीत. जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेऊन काम करणाऱ्या एका निरागस इसमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये एक स्वीगी डिलिव्हरी बॉय त्यांच्या दोन वर्षीय लेकीला घेऊन डिलिव्हरी बॉयची आणि वडिलांची भूमिका पार पाडत आहे. LocalKing.in चे संस्थापक व सीईओ मयंक अग्रवाल यांनी सोशल मीडियावर या डिलिव्हरी बॉयची व्यथा मंडळी आहे. त्यांनी डिलिव्हरी बॉयचा फोटो एक मोठ्या कथेसह शेअर केला आहे. त्यांनी एक पार्सल मागवले होते. “मी पोहोचलो आहे”, असे सांगत स्विगीच्या एका डिलिव्हरी बॉयचा फोन त्यांना आला. या फोन कॉलवर त्यांनी त्या बॉयला दुसऱ्या मजल्यावर यायला सांगितले. पण, फोन ठेवण्यापूर्वीच मयंक यांना एका लहान मुलाचा आवाज ऐकू आला. मग आश्चर्याने मयंक यांनी ‘तुमच्याबरोबर लहान मूल आहे का’, असे विचारले. यावेळी समोरुन ‘हो’ असे उत्तर आले. यावर त्यांनी ‘तुम्ही खालीच थांबा मी येतो’, असं म्हणत फोन ठेवला.
जेव्हा मयंक खाली आले तेव्हा डिलिव्हरी बॉयच्या बाईकवर जेमतेम दोन वर्षांची लहान मुलगी होती. मयंकने त्यांना विचारले, “ही चिमुकली तुमच्याबरोबर काय करते आहे”. त्यावर डिलिव्हरी बॉयने, “बाळंतपणात तिची आई वारली. त्यात घरी कोणीच नाही. मोठा भाऊ संध्याकाळी क्लासला जातो आणि तो परत येईपर्यंत मला तिची काळजी घ्यावी लागेल. तिचे नाव तुन तुन आहे”, असे सांगितले. तर डिलिव्हरी बॉय पंकज त्यांच्या चिमुकलीला घेऊन त्यांचे काम सांभाळतात. कारण त्यांच्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही. “जर तुम्ही हे करु शकत नसाल, तर घरी बसा. लहान मूल असणं ही तुमची समस्या आहे”, असे अनेक ग्राहक त्या डिलिव्हरी बॉयला सहज बोलून जातात. त्यामुळे प्रश्न पडतो की, समाज म्हणून आपण नक्की काय करीत आहोत. पण त्या डिलिव्हरी बॉयच्या चेहऱ्यावर फक्त स्मित हास्य होते.
आणखी वाचा – उत्तरप्रदेशमधील पालकांचा अभिमानास्पद निर्णय, १७ नवजात मुलींची नावं ठेवली ‘सिंदूर’ कारण…
हे सगळे बघून मयंक यांनी डिलिव्हरी बॉय पंकज आणि चिमुकली तुन तुनचा फोटो काढून linkedin अकाऊंटवरुन @Mayank Agarwal संपूर्ण गोष्ट लिहून पोस्ट केली आहे आणि “आपण किती गोष्टींना गृहीत धरतो आणि कितीजण दररोज शांतपणे अशा प्रकारचे ओझे वाहून काम करीत असतात. पण, पंकज आणि तुन तुन खरोखरच प्रेरणादायी आहेत. फोटो बघून मुलांच्या सुरक्षिततेबद्दल कोणीही चिंता व्यक्त करण्यापूर्वी, कृपया समजून घ्या पंकज आवडीनुसार नाही, तर जबरदस्तीने हे काम करीत आहेत. कृपया सहानुभूती दाखवा. तसेच स्विगी टीममधील कोणीतरी हे लक्षात घ्यावे आणि त्याला पाठिंबा देण्याचा मार्ग शोधावा. मी माझ्या क्षमतेनुसार जे काही करु शकलो, ते मी केले. त्याचे सौम्य हास्य आणि त्या मुलीचा निरागस चेहरा मला नेहमीच आठवत राहील. तुमच्यापैकी ज्यांना त्याला आर्थिक मदत करायची आहे, ज्यांना त्याचा फोन नंबर हवा आहे, त्यांनी कृपया मला DM करा. मी त्याच्या परवानगीने त्याचा फोटो आणि त्यांची गोष्ट येथे पोस्ट करीत आहे”, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.