बॉलिवूडमधील सतत चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री मलायका अरोरा. अर्जुन व मलायका यांच्यात गेले काही दिवस आलबेल नसून त्यांच्या नात्याविषयीच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. याआधी अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसणारी ही जोडी गेले काही दिवस एकत्र दिसत नाहीये. दोघांमध्ये काहीतरी बिनसले असून त्यांच्या ब्रेकअपच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अखेर अर्जुनने ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केलं आहे. (Arjun Kapoor Breakup With Malika Arora)
गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन-मलायका या दोघांचं नातं तुटल्याची चर्चा होती; मात्र त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता त्याने स्वतःला सिंगल असल्याचे म्हटलं आहे. मलायका व अर्जुन सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अर्जुनने त्याच्या व मलायकाच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. अर्जुन कपूरचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनसाठी इथे टीम पोहोचली होती. याचठिकाणी बोलताना अर्जुनने त्याच्या व मलायकाच्या ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे.
मनसे च्या कार्यक्रमात अर्जुनने हातात माईक घेताच लोक गर्दीतून मलायकाचं नाव घेतात. हे ऐकून अर्जुन म्हणतो “मी सिंगल आहे”. त्यानंतर त्याने असं म्हटलं की, “माझी ओळख ‘टॉल व हँडसम’ अशी करून दिली. त्यामुळे वाटलं की लग्नाबाबत बोलणार आहेत, त्यामुळे मी असं म्हटलं”. त्यानंतर त्याने सर्वांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सोशल मीडियावर अर्जुनचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे अर्जुन-मलायका यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे.
मलायकाने २०१७ मध्ये अरबाज खानबरोबर घटस्फोट घेतला. त्यानंतर ती अर्जुन कपूरला डेट करू लागली. मलायका व अर्जुन कपूर २०१८ पासून एकत्र होते. दोघांनी त्यांचं नातं लपवून ठेवलं नव्हतं. ते एकमेकांबरोबरचे व्हेकेशनचे फोटो शेअर करायचे. अर्जुनही मलायकाबरोबरच्या नात्याबद्दल जाहीरपणे बोलायचा, मात्र मागील काही दिवसांपासून दोघांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात होतं.