‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रेम देताना दिसतात. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तसेच मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. या मालिकेतून खलनायकी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री रुपाली भोसले हिने तिच्या ग्रे शेडने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. रुपालीची संजना ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. या मालिकेमुळे रुपालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर रूपाली नेहमीच सक्रिय असते. (Rupali Bhosale Kitchen)
नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच काही दिवसांपूर्वी रुपालीने तिचं नवं आणि हक्काचं घर मुंबईत घेतलं असल्याचं समोर आलं. सुंदर असा व्हिडीओ शेअर करत तिने याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली. अगदी लहानपणापासून स्वतःच हक्काचे घर घेण्याचे स्वप्न तिचं पूर्ण झालंय. तिच्या घराच्या गृहप्रवेशाचा गणेशोत्सवादरम्यानचे घरातील अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान वायरल झालेले पाहायला मिळाले. आता या पाठोपाठ रुपालीने शेअर केलेल्या आणखी एका व्हिडीओने साऱ्यांच लक्ष वेधून घेतले.
रुपालीने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या स्वयंपाक घरातील आहे. नव्या घरातील नव्या स्वयंपाक घरात रुपालीने पहिल्या बनवलेल्या पदार्थाचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. यावेळी रुपाली सुंदर असा साजूक तुपातील प्रसादाचा शिरा बनवताना दिसत आहे. अगदी मराठमोळ्या पारंपरिक वेशात रुपालीने स्वयंपाक घरात जात मराठमोळा असा खास पदार्थ बनवला असल्याचे दिसतेय. यावेळी रुपालीच्या सुंदर आणि टापटीप अशा स्वयंपाक घराची ही झलक पाहायला मिळाली. मॉड्युलर किचन असलेल्या या स्वयंपाक घराने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
“परमेश्वराचे, आईवडीलांचे आशीर्वाद, असंख्य मित्र मैत्रिणी व फॅन्सच्या सदिच्छा यांमुळे मी नवीन घरात आई, बाबा आणि संकेतबरोबर प्रवेश करत आहे. तुम्ही आजवर दाखवत आलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे. मनापासून धन्यवाद”, असं म्हणत सोशल मीडियावरुन तिने नव्या घराची झलक काही महिन्यांपूर्वी शेअरही केली होती.