Pravin Dabas Accident : बॉलिवूड अभिनेता प्रवीण डबासचा भीषण कार अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. प्रवीण डबासचा भीषण कार अपघात झाला असून त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. गंभीर जखमी अवस्थेत अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी सकाळी मुंबईत प्रवीण डबासचा कार अपघात झाला. अपघातानंतर प्रवीणला मुंबईतील वांद्रे येथील रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं आहे आणि त्याच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. अभिनेत्याबरोबर सध्या त्याची पत्नी अभिनेत्री प्रीती झांगियानी आहे. (Pravin Dabas Accident)
प्रवीण हा आर्म रेसलिंग प्रो पंजा लीगचा सह-संस्थापक आहे. प्रो पंजा लीगने अभिनेत्याच्या अपघाताच्या निवेदनात असं म्हटलं आहे की, “प्रो पंजा लीगचे सह-संस्थापक प्रवीण डबास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे आम्हाला दुःख होत आहे. शनिवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी कार अपघातानंतर त्यांना वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे या कठीण काळात प्रवीण आणि त्याच्या कुटुंबियांबरोबर आम्ही आहोत”.
यापुढे या निवेदनात असं म्हटलं आहे की, “या कठीण काळात प्रवीण आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेची काळजी घ्यावी. प्रवीण लवकर बरा व्हावा अशी इच्छा आम्ही व्यक्त करत आहोत”. मेडिकल अपडेटनुसार, प्रवीणला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला सीरियस कंसशन म्हणजेच मेंदूला गंभीर दुखापत झाल्यानंतरच्या स्थितीत आहे. त्याला आणखी दुखापत झाली आहे का, हे पाहण्यासाठी डॉक्टरांकडून सीटी स्कॅन आणि इतर चाचण्या करण्यात येत आहेत. तो या क्षणी जास्त हालचाल करू शकत नाही. अपघातापूर्वी तो त्याच्या कामात फार व्यस्त होता.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : कॅप्टनसीमुळे अरबाज सुरक्षित, आता नक्की घराबाहेर कोण जाणार?, वेगवेगळ्या नावांची चर्चा
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता प्रवीण डबासचे वय ५० वर्ष आहे. अभिनेता अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये दिसला आहे. प्रवीणने आतापर्यंत ‘दिल्लगी’, ‘मान्सून वेडिंग’, ‘खोसला का घोंसला’, ‘द हीरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’, ‘मैने गांधी को नही मारा’, ‘ये है जिंदगी’, ‘कुछ मीठा हो जाए’, ‘इंदू सरकार’, ‘रागिनी एमएमएस 2’ आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.