Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता आठवा आठवडा सुरू झाला आहे. या आठव्या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्कही सुरू झाला आहे. ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना कॅप्टन्सीचा टास्क दिला आहे. घरात स्पर्धकांना राहून आता जवळपास ५० दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे घरातील स्पर्धकांमध्ये घरात टिकून राहण्यासाठी व अंतिम सोहळ्यापर्यंत टिकून राहण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अशातच या घरातील नात्यांची समीकरणेही बदलतानाचे पाहायला मिळत आहे. घरात सुरुवातीला मित्र असणारे आता एकमेकांच्या विरोधात उभे राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरज चव्हाण हा अतिशय स्ट्रॉंग प्लेअर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला टास्क कळायला वेळ लागत असला तरी तो टास्क पूर्ण ताकदीने खेळतो. घरातील टास्कबद्दल अंकिता व पॅडी त्याला वेळोवेळी समजावत असतात. अशातच आता घरात सूरज व डीपी यांच्यात काही कारणावरुन बाचाबाची झाली असून त्यांच्यात झालेल्या या बाचाबाचीमध्ये अंकिता मध्यस्थी करणार आहे, बिग बॉस मराठीचा एक नवीन व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे, ज्यात अंकिता सूरजची समजूत काढत आहे.
यावेळी अंकिता सूरजला समजावत म्हणाली की, “तू असं कसं म्हणालास त्यांना की मला सांगू नका माझं काय करायचं ते… असं बोलणं चांगलं आहे का? असं नाही बोलायचं…” यावर सूरज असं म्हणतो की, “मी माझं सांगितलं. मी बोलत असताना ते मध्ये बोलले म्हणून मी बोललो. नाही तर मी असं मध्ये कुणाला काही बोलत नाही”. यानंतर अंकिता पुन्हा त्याची समजूत काढत त्याला सांगते की, “त्यांनी तुला चांगल्यासाठीचं सांगितलं ना? काहीतरी आपण कामाचं करत आहोत”.
यापुढे सूरजही त्याची बाजू मांडत असं म्हणाला की, “कामाचं बोलले हे मला माहीत आहे. पण डीपीदादा मध्ये बोलले म्हणून मी बोललो, नाहीतर मला मध्ये मध्ये करायची काही गरज नाही. मी माझं माझं असंच काहीतरी डायलॉग बोलत असताना ते मध्येच बोलले आणि हसायला लागले. म्हणून मी बोललो”. त्याचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अंकिता पुन्हा त्याला असं म्हणते की, “आपण मोबाईलवर वगैरे जे करतो ते वेगळं असतं आणि इथे वेगळं असतं. त्यामुळे जे काय ते नीट सांगायचं”.
दरम्यान, बुधवारी झालेल्या कॅप्टन्सीच्या शर्यतीमधून पंढरीनाथ कांबळे अर्थात पॅडी व अंकिता वालावलकर हे दोघे बाहेर पडले आहेत. ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना कॅप्टन्सीचा टास्क दिला आहे. त्यानुसार, घरातील सदस्यांना अंडे मिळवून कॅप्टन पदाच्या शर्यतीत नको असणार्या सदस्याच्या नावाने घरट्यात अंडे टाकायचे आहे. या फेरीत अरबाज अगदी सहजपणे जान्हवी, संग्रामला अडवतो आणि यामुळे निक्की अंडी उचलून अंकिता व पंढरीनाथ यांच्या घरट्यात टाकते. यामुळे हे दोघंही कॅप्टन्सी कार्यातून बाद होतात.