स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका कायमच लोकप्रियतेच्या शिखरावर असते. मालिकेतील सायली-अर्जुन या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरीने सायलीची भूमिका साकारली आहे. आपल्या निरागस अभिनयाने सायली फेम जुईने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी जुईने सोशल मीडियावर तिचा हॉस्पिटलमधील सलाईन लावलेला फोटो शेअर केला होता. तेव्हापासून तिचे अनेक चाहते मंडळी चिंतेत होते. अभिनेत्रीला नेमकं काय झालं आहे? याबाबत तिचे चाहते सोशल मीडियाद्वारे चिंता व्यक्त करत होते. मात्र तिला काय झालं आहे? हे नेमकं कुणालाच माहीत नव्हतं. आजारी असताना जुईने एक फोटो शेअर करत ‘लवकरच काय झालं आहे ते शेअर करेन’ असं म्हटलं होतं आणि अखेर तिने तिच्या आजारपणाचं कारण सांगितलं आहे. (Jui Gadkari Ear Surgery)
जुईने एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “हॅलो.. आज बऱ्याच दिवसांनी व्हिडीओ करत आहे. सगळे मला विचारत होते काय झालं होतं? तर जुलैमध्ये एका छोट्याशा अपघातामध्ये माझ्या डाव्या कानाचा पडदा फाटला होता आणि रक्त आलं होतं. मला खूपच त्रास होत होता आणि त्यामुळे ऐकूसुद्धा येत नव्हतं. त्यामुळे कान बरा होईल म्हणून आम्ही वाट बघत होतो. कारण पडदा आपोआप बरा होतो. आम्ही खूप वाट बघितली पण तो काही बरा झाला नाही. त्यामुळे मग सर्जरी करण्याचं ठरवलं आणि त्यामुळे तुम्ही माझ्या कानामध्ये जो कापूस बघत होता तो त्यासाठीच होता. यासाठी आम्ही मालिकेचे कथानक वगैरे सांभाळून घेतलं आणि मग मी पाच दिवसांसाठी सुट्टीवर गेले”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातील सर्व सदस्यांना बसणार शॉक, पण नेमकं झालं तरी काय? पहा हा खास प्रोमो
यापुढे जुई असं म्हणाली की, “पाच दिवसांच्या सुट्टीनंतर मी पुन्हा जोमाने शूटिंगला आलेली आहे आणि ह्या सगळ्या दरम्यान माझ्या टीमने मला खूप पाठींबा दिला. कारण तेव्हा माझ्या काही सहकलाकारांनादेखील बरं वाटत नव्हतं. पण आम्ही आमच्या एपिसोड्सची बँक बनवली होती. मालिकेचे कथानक वगैरे त्यानुसार सांभाळलं आणि त्यामुळेच प्रियाने मला ढकललं. मात्र, आता पुढचे काही दिवस काळजी घ्यायची आहे. सर्जरीच्या दरम्यान, चॅनलनेसुद्धा मला खूप पाठींबा दिला आणि सांभाळून घेतलं. तसंच प्रोडक्शन टीमनेही सांभाळून घेतलं”.
तसंच यापुढे जुईने असं म्हटलं की, “आता मी बरी होत असून तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी हळूहळू आता बरी होत आहे! कृपया ठ’रलं तर मग’च्या थांबलेल्या शूटबद्दल काही युट्यूब चॅनेलवर प्रसारित केलेल्या बनावट व्हिडीओंवर विश्वास ठेवू नका. मालिकेवर असंच प्रेम करत रहा आणि सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता रोज ही मालिका बघत रहा”.