‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे. उत्तम विनोदीशैलीने या कार्यक्रमाने आजवर प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. २८ जुलै रोजी या मालिकेला १६ वर्षे पूर्ण होणार आहेत. याआधीच निर्मात्यांनी मालिकेच्या प्रेक्षकांना एक वाईट बातमी सांगितली आहे. निर्मात्यांनी शुक्रवारी, २६ जुलै रोजी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की आता एका प्रसिद्ध अभिनेत्याने या शोमधून एक्झिट घेतली आहे. (Kush Shah Quit TMKOC)
दरम्यान अभिनेत्याने स्वतः एक व्हिडीओ शेअर करत त्याचा संपूर्ण प्रवास या व्हिडीओमार्फत दाखवला आणि सांगितले की, तो आता हा शो सोडत आहे. मालिकेचा निरोप घेताना त्याने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या संपूर्ण कुटुंबासह केकही कापला. या शोमध्ये ‘गोली’ची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शाह याने शोचा निरोप घेतला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या यूट्यूब चॅनलवर कुशचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये कुशचा शोच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
या व्हिडीओद्वारे कुश त्याच्या प्रेक्षकांचे आभार मानत आहे. प्रेक्षकांनी व गोकुळधाम सोसायटीने भरभरुन प्रेम दिल्याचंही त्याने म्हटलं आहे. या यूट्यूब व्हिडीओमध्ये कुश शाह म्हणत आहे की, “नमस्कार प्रेक्षकांनो लहान मुले जी आमच्यावर प्रेम करतात. मी तुमचा गोली तुम्हाला मनापासून सलाम करतो. जेव्हा तुमची आणि माझी ओळख झाली तेव्हा मी खूप लहान होतो. तेव्हापासून तू मला खूप प्रेम दिलं आहेस. या गोकुळधाम परिवाराने मला जेवढे प्रेम दिले आहे तेवढेच प्रेम मला पुढेही मिळूदे. या कार्यक्रमाशी माझ्या खूप आठवणी आहेत. मला खूप मजा आली”.
कुश शाह पुढे म्हणाला, “माझे बालपण येथेच गेले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीही येथेच मोठा झालो.’ शोमधून बाहेर पडताना कुश शाह भावुक झाला. तो पुढे म्हणाला, “मी या शोमध्ये १६ वर्षे पूर्ण केली आहेत आणि या १६ वर्षांचा प्रवास खूप सुंदर होता. तुझ्या प्रेमामुळेच हा प्रवास सुंदर झाला आहे. त्यामुळे तुमचे प्रेम लक्षात घेऊन मी या शोला निरोप देत आहे”.