असे अनेक बॉलीवूड कलाकार आहेत ज्यांचा पहिलाच चित्रपट हिट झाला आणि ते रातोरात स्टार बनले. तर काही अभिनेत्री अशा होत्या ज्यांनी कधी व्यावसायिक कारणांमुळे तर कधी वैयक्तिक कारणांमुळे शिखरावर असताना इंडस्ट्री सोडावी लागली. करिअर इंडस्ट्री सोडल्यानंतर या अभिनेत्री गायब झाल्या. अशीच एक अभिनेत्री म्हणजे जी पदार्पणानंतर लगेचच सुपरस्टार बनली पण तिने आपल्या करिअरचा त्याग केला आणि प्रेमाला प्राधान्य दिले. मात्र यांतही तिचे लग्न टिकले नाही. (Pooja Batra Career)
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती म्हणजे पूजा बत्रा. १९७५ मध्ये जन्मलेली पूजा बत्रा ही भारतीय लष्करातील कर्नल रवी बत्रा यांची मुलगी आहे. ती १९९३ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेची उपविजेती होती आणि १९९३ मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब तिने जिंकला होता. पूजा बत्राने तिच्या करिअरमध्ये गोविंदा, संजय दत्त, अनिल कपूर व सुनील शेट्टी यांसारख्या अनेक सुपरस्टार्सबरोबर काम केले होते.
मात्र, केवळ ३० चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर पूजाने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. तिने अमेरिकेत राहणाऱ्या डॉ. सोनू अहलुवालियाशी लग्न केले आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले. पूजा बत्राने प्रेमासाठी तिच्या करिअरचा आनंदाने त्याग केला पण तिचे लग्न फार काळ टिकले नाही. २०११ मध्ये तिने पहिल्या पतीपासून घटस्फोटासाठी अर्ज केला होता त्यावेळी मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की, पूजाला हॉलिवूडमधून ऑफर येत होत्या पण तिचा नवरा पुन्हा शोबिझमध्ये काम करण्याच्या विरोधात होता.
पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री भारतात परतली आणि बॉलिवूडमध्ये तिची दुसरी इनिंग सुरु केली. ती तिच्या मागील यशाची पुनरावृत्ती करु शकली नाही आणि तिला फक्त लहान भूमिका मिळाल्या ज्यामुळे तिची कारकीर्द पुढे जाऊ शकली नाही. २०२१ मध्ये पूजा बत्राने ‘स्क्वॉड’मधून ओटीटीमध्ये पदार्पण केले. पूजा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि आता ती अनेक ब्रँडबरोबर काम करत आहे. २०१९ मध्ये पूजा बत्राच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाने प्रवेश केला आणि तिने अभिनेता नवाब शाहबरोबर दुसरे लग्न केले. नवाब शाह हे ‘डॉन २’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ मधील भूमिकांसाठी ओळखले जातात. पूजाला आता चित्रपटांमध्ये काम मिळत नसले तरी पूजा बत्रा आता सुखी वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. पूजा बत्राही तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते, जे चाहत्यांना खूप आवडते.