‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शन व ‘इट्स मज्जा’ ओरिजिनल यांच्या ‘आठवी-अ’ या वेबसीरिजने मनोरंजन विश्वात एक वेगळीच ओळख निर्माण केली. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधीसोपी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या सीरिजद्वारे सांगण्यात आली आणि या सीरिजला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. या सीरिजने गेले अनेक दिवस प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. त्यामुळे या सीरजमध्ये येणाऱ्या अनेक ट्विस्ट्स व रंजक वळणांमुळे या सीरिजच्या प्रत्येक भागासाठी प्रेक्षक आतुर असायचे.
आपण ‘आठवी-अ’मध्ये का नाही? आमच्यात काय कमी आहे? सगळ्यांना समान वागणूक का नाही? आपल्यात होणारा बदल नेमका काय आहे? प्रेम म्हणजे काय? मैत्री म्हणजे काय? असे बरेच प्रश्न बालवयात पडत असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘आठवी-अ’ या सीरिजमधून प्रेक्षकांना देण्यात आली. मात्र प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच. त्यामुळे या सीरिजने नुकताच सर्वांचा निरोप घेतला आहे. ‘आठवी-अ’ ही सीरिज संपल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सुर आहे. पण ‘आठवी-अ’ ही सीरिज संपली असली तरी ‘इट्स मज्जा’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कायमच तत्पर असणार आहे.
हेही वाचा – “दौरा छान असला तरी…”, परदेशात निघालेला संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, “मुंबईची, घरची आणि…”
प्रेक्षकांच्या याच मनोरंजनाची हमी घेत ‘इट्स मज्जा’ लवकरच ‘पाऊस’ ही नवीन सीरिज प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. ‘पाऊस’ हा कायमच प्रत्येकासाठी स्पेशल असतो. पावसाबरोबरच्या अनेकांच्या खास आठवणी असतात आणि या आठवणी बेभान करणार्या असतात. त्यामुळे ‘इट्स मज्जा’च्या ‘पाऊस’साठीदेखील अनेक प्रेक्षक आतुर आहेत. नुकताच ‘पाऊस’ या नवीन सीरिजचा मुहूर्त पार पडला असून सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे आणि अनेक प्रेक्षकांनी या नव्या सीरिजबद्दल उत्सुकता दाखवली आहे.
त्यामुळे आता या सीरिजची नेमकी कथा काय आहे? या नवीन सीरिजमध्ये कलाकार कोणते आहेत? या नवीन सीरिज मधून प्रेक्षकांना नवीन काय पाहायला मिळणार आहे. याची सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, या नवीन सीरिजची कथा व दिग्दर्शन हे ‘आठवी-अ’च्या नितीन पवार यांचेच असून या नवीन सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी स्वीकारली आहे तर या सीरिजच्या क्रिएटीव्ह हेड अंकिता लोखंडे आहेत. तसेच ही सीरिज तुम्हाला ‘इट्स मज्जा’ या युट्यूब वाहिनीवर पाहता येणार आहे.