रविवारी वरळीमध्ये घडलेल्या हिट अँड रन या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण मुंबईला खूप मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असताना मुंबईत घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने साऱ्यांचे डोळे उघडले आहेत. मुंबईतील वरळी परिसरात एका दाम्पत्याचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतील या हिट अँड रन प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. वरळीत शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलाच्या महागड्या गाडीनं या महिलेला चिरडलं असल्याचं समोर आलं आहे. (Jaywant Wadkar On Worli Hit and Run Case)
रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास वरळीतील अँट्रिया मॉलजवळ ही घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरुन नाखवा दाम्पत्य प्रवास करत होते. ससून डॉकवरुन मासे विकत घेऊन घरी परतत असताना BMW ने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रदीप नाखवा बचावले, पण त्यांच्या पत्नी कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. मृत कावेरी या ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या पुतणी असून त्यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला.
वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शाह विरोधात लूक आऊट नोटीस पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे. मिहिर हा मागील २४ तासांपासून फरार असून आता त्याने परदेशात पलायन केल्याचंही बोललं जात आहे. याप्रकरणातील आरोपी मिहीर शहाचे वडील शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा हे आहेत. या प्रकरणावरुन आता जयवंत वाडकर यांनी ‘एबीपी’ वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला.
यावेळी बोलताना जयवंत वाडकर म्हणाले की, “पुढे फरफटत तिला नेलं. त्यानंतर गाडी चालत नाही म्हणून तिला बाहेर काढून पुन्हा गाडी तिच्यावरुन नेली असं मला वाटतं. त्यानंतर गाडी सोडून ते ऑटोने गेले. अपघातात खूप मोठी क्रूरता पाहायला मिळत आहे. हा उद्दामपणा, पैशाचा माज मोडलाच पाहिजे. आणि माझा पोलिसांवर विश्वास आहे ते नक्की योग्य तो न्याय देतील. जामीन मिळवून आपण कोणालाही मारु शकतो. इतकं हे सोप्प झालं आहे की, दोन पोलिसांना उडवलं त्यांनाही जामीन मिळतो. हे सगळं थोतांड आहे. ही सिस्टीम पोखरली गेली आहे. या सिस्टिमला मी आव्हान करतो की, थोडी तरी दया तुमच्यात शिल्लक असेल तर या अशा लोकांना सोडलं नाही पाहिजे. भर चौकात त्यांना मारलं पाहिजे”.