Bigg Boss Ott 3 : ‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये लवकेश म्हणजेच लव कटारियाने बाहेरच्या व्यक्तीची भूमिका साकारत खूप धमाल केली. ‘बिग बॉस’ने त्याला प्रत्येक संभाषणात बाहेरचा माणूस असल्याचा भरपूर फायदा करुन दिला आणि लवने राजा बनून स्वतःसाठी मिळालेली ही खास वागणूक अनुभवली. पण आता त्याचे सत्य सर्व कुटुंबीयांसमोर आले आहे आणि याबरोबर ‘बिग बॉस’ने त्याला कठोर शिक्षाही दिली आहे. शिक्षा म्हणून लवचा एक हात १२ तास बेड्यांमध्ये बांधलेला दिसत आहे.
लवचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. ज्यात तो हात बांधल्यामुळे संघर्ष करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये लवला असे दिसत आहे की, त्याला खूप दुखत आहे. शिवाय तो अस्वस्थ असल्याचंही त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्टपणे दिसत आहे. इतकंच नाही तर या व्हिडीओमध्ये एवढं भयानक दृश्य कैद करण्यात आलं आहे की, ते पाहून साऱ्यांना धक्का बसला आहे. खरं तर, कॅमेऱ्यासमोर दिसणाऱ्या लव मागील दृश्यही या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. लव कटारियाच्या मागे दिसणाऱ्या सापाकडेही सोशल मीडिया यूजर्सची नजर पडली आहे. या व्हिडीओमध्ये लवच्या मागे भिंतीजवळ साप रेंगाळताना स्पष्टपणे दिसत आहे.

या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर लोकांनी लवकेशला पाठिंबा दिला आहे. एकाने म्हटले आहे की “याच्या मागे खरोखर साप आहे की काही एडिटिंग केलं आहे?”. या व्हिडीओनंतर अनेकजण संतापलेले दिसत आहेत. एकजण म्हणाला, “भाऊ, ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांना काय झाले, ते वेडे झाले आहेत का?”. तर एकाने म्हटलं आहे की, “असा कसला नियम मोडला की एका व्यक्तीला इतके तास हातकडी बांधली आहे”.
लवचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो रात्री झोपताना खूप अस्वस्थ दिसत आहे. किंबहुना हात बांधल्यामुळे तो पुन्हा पुन्हा उठून बसलेला दिसत आहे. बऱ्याच लोकांनी म्हटले आहे की, “‘बिग बॉस’ने आमच्या भावाबरोबर हे चुकीचे केले आहे, आम्ही आमच्या भावाला ‘बिग बॉस’ जिंकून देऊ आणि याचा बदला घेऊ”. त्यावेळी रात्रभर विशालही लवबरोबर होता आणि लोक दोघांच्या मैत्रीमुळे प्रभावित झाले आहेत. तर काहींनी असं म्हटलं आहे की, “विशालने खरी मैत्री दाखवली आणि आता कटारियाने त्याची परतफेड केली पाहिजे”.