काहीवेळा नवरा-बायको यांच्या नात्यात काही कारणास्तव दुरावा येतो. या दुराव्यातू मार्ग काढण्यासाठी ते एकमेकांपासून विभक्त होतात. मात्र तरीदेखील आपल्या मुलासाठी काही पालक समजुतीने एकत्र येतात. मुलांना आई व वडील या दोघांचे प्रेम मिळावे म्हणून अनेक नवरा-बायको त्यांच्यातील मतभेद विसरुन पुन्हा एकत्र येतात. असंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनच्या भावाबद्दल. अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये घटस्फोट घेतला. मात्र घटस्फोटानंतरही राजीव व चारू अनेकदा एकमेकांबरोबर वेळ घालवत आहेत. नुकतेच दोघे दुबईला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे राजीव व चारू यांना पुन्हा एकत्र पाहून त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकदा एकत्र राहण्यास सांगत आहेत.
चारू व राजीव यांचा २०२३ मध्ये घटस्फोट झाला होता. त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी आल्या. त्यांनी ते सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण दोघांनाही त्यांचं नातं टिकवता आलं नाही. या दोघांना जियाना नावाची एक मुलगीदेखील आहे. मात्र घटस्फोटानंतर जियाना चारूबरोबर राहत आहे. राजीव व चारू दोघे जियानासाठी एकत्र दिसत आहेत. अशातच नुकतेच राजीव त्याची माजी पत्नी चारू आणि मुलीबरोबर दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. यावेळी राजीवने त्याच्या व चारूच्या नात्याबद्दल हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधला.
‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना त्याने असं म्हटलं की, “चारू आणि मी अजूनही चांगले मित्र आहोत आणि पालक म्हणून आम्ही आमची मुलगी जियानाला पूर्णपणे समर्पित आहोत. मला आणखी काही सांगायचे नाही”. यापुढे त्याने त्याच्या दुबईच्या सुट्टीबद्दल बोलताना असं म्हटलं की, “चारू आणि जियानाबरोबरचा माझा प्रवास खूप मजेदार आणि अद्भुत होता. जिआनालाही खूप आनंद झाला. ती खूप आनंदी होती. जियानाला माझ्याकडून खूप वेळ मिळतो हे महत्त्वाचे आहे आणि दुबईची सुट्टीही खूप चांगली होती, कारण मला तिच्याबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळाली”.
दरम्यान,राजीव व चारू यांनी २०१९ मध्ये एकमेकांशी लग्न केले होते. पण काही महिन्यांनंतर त्यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणींच्या बातम्या समोर आल्या. मग २०२१ मध्ये त्यांची लेक जियानाचा जन्म झाला. सप्टेंबर २०२२ मध्ये पुन्हा दोघांनीही त्यांच्या नात्याला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र दोन दिवसातच त्यांनी एकमेकांवर अनेक आरोप केले आणि अखेर २०२३ मध्ये त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला होता.